Anahat Singh Silver : १८ वर्षांच्या अनाहत सिंहने नागोयात रचला इतिहास! महिला एकेरी स्क्वॉशमध्ये जिंकले पहिलेवहिले रौप्यपदक
Anahat Singh Silver : १८ वर्षीय भारतीय महिला स्क्वॅशपटू अनाहत सिंहने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची संधी गमावली असली तरी, ती आशियाई क्रीडा स्पर्धेतील या प्रकारात रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

Asian Games 2026 Squash Anahat Singh Abhay Singh Win Historic Silver Medals In Singles : जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) च्या स्क्वॉश कोर्टवरून भारतासाठी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. भारताची अवघ्या १८ वर्षांची युवा सनसनाटी अनाहत सिंहने (Anahat Singh) महिला एकेरी प्रकारात ऐतिहासिक रौप्यपदक (Silver Medal) पटकावले आहे. अंतिम फेरीत मलेशियाच्या अव्वल मानांकित शिवसंगरी सुब्रमण्यमकडून तिला ४-११, ४-११, ७-११ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, सुवर्ण हुकले तरी आशियाई स्पर्धेच्या इतिहासात महिला एकेरी स्क्वॉशमध्ये रौप्यपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
सेमीफायनलमधील वादळी विजय; थेट ऑलिम्पिक पात्रता मात्र निसटली!
अनाहतने उपांत्य फेरीत दोन गेमने पिछाडीवर असताना आणि दोन मॅच पॉइंट्स वाचवत जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असणाऱ्या जपानच्या सातोमी वातानाबेला नमवून सर्वांना थक्क केले होते. फायनलमध्ये मात्र मलेशियाच्या अनुभवी खेळाडूने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत रॅलींवर ताबा मिळवला. अंतिम सामन्यातील पराभवामुळे अनाहतचे २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील थेट प्रवेशाचे (Direct Qualification) स्वप्न अवघ्या एका पावलाने हुकले.
पुरुषांमध्ये अभय सिंहलाही रौप्य; सौरव घोषालनंतर ठरला दुसरा भारतीय!
A silver to cap a memorable squash campaign for Anahat. 🥈
India’s first women’s singles finalist at the #AsianGames added another medal to her collection. ✨ pic.twitter.com/tN2M5uco92
— Olympic Khel ™ (@OlympicKhel) September 27, 2026
दुसरीकडे, पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या अभय सिंहलाही (Abhay Singh) रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. सुवर्णपदकाच्या लढतीत मलेशियाच्या इन यो एनजीने अभयचा ११-९, ११-५, ११-५ असा सरळ गेममध्ये पराभव केला. सौरव घोषालनंतर (२०१४ आणि २०२३) आशियाई स्पर्धेतील पुरुष एकेरीत रौप्य जिंकणारा अभय हा भारताचा दुसराच खेळाडू ठरला. त्यालाही ऑलिम्पिकचे थेट तिकीट मिळवता आले नाही.
स्क्वॉशमध्ये भारताचा दुहेरी रौप्यधमाका; नागोयात मान उंचावली!
Silver for Abhay 🥈
India’s Abhay Singh finishes his #AichiNagoya2026 campaign with a silver medal in squash men’s singles. 👏 pic.twitter.com/PfijjpXDMM
— Olympic Khel ™ (@OlympicKhel) September 27, 2026
जरी दोन्ही खेळाडूंना सुवर्णपदकाने हुलकावणी दिली असली, तरी एकेरी प्रकारात एकाच दिवशी दोन रौप्यपदके जिंकून भारताने स्क्वॉशच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. अवघ्या १८ वर्षांच्या अनाहत सिंहच्या या ऐतिहासिक कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे.





