Pranati Nayak Controversy : आशियाई स्पर्धेत धक्कादायक प्रकार! जिम्नॅस्ट प्रणती नायक अन् कोच अशोक मिश्राला दिली एकच रूम
Pranati Nayak Controversy : आशियाई क्रीडा स्पर्धेत, स्टार जिम्नॅस्ट प्रणती नायक आणि प्रशिक्षक अशोक मिश्रा यांना एकच खोली देण्यात आली होती, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता.

Asian Games 2026 Nagoya Shocker Gymnast Pranati Nayak And Male Coach Ashok Mishra Allotted Same Room : जपानमधील नागोया येथे आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारतीय खेळाडूंना स्थानिक व्यवस्थापनाच्या प्रचंड अनागोंदीचा सामना करावा लागला आहे. खेळाडूंच्या निवासासाठी क्रीडा गाव म्हणून वापरल्या जाणाऱ्या आलिशान क्रूझ शिपवर स्थानिक आयोजकांनी सर्व नियम व मर्यादा धाब्यावर बसवत एक मोठा धक्का दिला. ज्यामुळे भारतीय पथकातील सदस्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
भारताची आघाडीची महिला जिम्नॅस्ट प्रणती नायक आणि पुरुष जिम्नॅस्टिक प्रशिक्षक अशोक मिश्रा यांना चक्क एकच खोली (Room) अलॉट केली. हा अजब प्रकार समोर येताच क्रीडा जगतात प्रचंड खळबळ उडाली. अखेर प्रकरण चिघळत असल्याचे पाहून भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (IOA) अधिकाऱ्यांनी मध्यरात्री तातडीने हस्तक्षेप करत हा वाद मिटवला.
३० तासांचा प्रवास अन् मध्यरात्री धक्का; खेळाडू-प्रशिक्षकाचा तीव्र विरोध!
Room allocation error puts Indian gymnast Pranati Nayak and coach in same cabin at 2026 Asian Games.https://t.co/4ZBlJPqRST pic.twitter.com/7QFfOqHD9W
— Gulf News (@gulf_news) September 18, 2026
प्रणती नायक आणि तिचे प्रशिक्षक अशोक मिश्रा तब्बल ३० तासांहून अधिक काळ अत्यंत दमवणारा विमानप्रवास करून मध्यरात्री नागोया येथील क्रूझवर पोहोचले होते. मात्र, एकाच खोलीचे वाटप झाल्याचे समजताच दोघांनाही मोठा धक्का बसला. दोघांनीही या निर्णयाला तात्काळ कडाडून विरोध केला आणि स्वतंत्र खोल्यांची आग्रही मागणी लावून धरली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आयओएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक आयोजकांशी तातडीने चर्चा करून दोघांच्या स्वतंत्र निवासाची व्यवस्था केली.
रिसेप्शनवर नावातील स्पेलिंगचा घोळ; थकलेले प्रशिक्षक ४५ मिनिटे बाहेर बसून!
A midnight accommodation mix-up at the Asian Games saw Indian gymnast Pranati Nayak and coach Ashok Mishra assigned the same cruise ship room.
The IOA intervened, resolving the issue around 1:30 am. Mishra then faced another 45-minute delay after a missing letter in his name… pic.twitter.com/SlGysq7FPH
— Diganta Guha (@diganta_guha) September 18, 2026
या गोंधळात आणखी एका अजब नाट्याची भर पडली. क्रूझच्या मुख्य गेटवर प्रवेश मिळाल्यानंतर रिसेप्शनवरील रजिस्टरमध्ये प्रशिक्षक अशोक मिश्रा यांचे नावच मिळेना. कर्मचाऱ्यांनी ते नोंदणीकृत नसल्याचे सांगत थकलेल्या प्रशिक्षकाला मध्यरात्री १ ते २ च्या सुमारास सुमारे ४५ मिनिटे बाहेर ताटकळत ठेवले. नंतर तपासात उघड झाले की, कॉम्प्युटर सिस्टममध्ये त्यांच्या नावात ‘MISHRA’ ऐवजी स्पेलिंग एररमुळे ‘MSHRA’ अशी नोंद झाली होती.
मध्यरात्री २ वाजता वाद मिटला; प्रणतीला स्वतंत्र खोली, मिश्रा वेटलिफ्टिंग कोचसोबत!
आयओएच्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास नागोया आयोजन समितीवर दबाव आणून या समस्येवर तोडगा काढला. नव्या व्यवस्थेनुसार महिला जिम्नॅस्ट प्रणती नायकला स्वतंत्र खोली देण्यात आली, तर प्रशिक्षक अशोक मिश्रा यांची सोय भारताचे वेटलिफ्टिंग मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांच्या खोलीत करण्यात आली.





