Asian Games 2026 : 44 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपला! सवान बरवालने मॅरेथॉन शर्यतीत पटकावले ऐतिहासिक रौप्यपदक
आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2026) भारतासाठी शनिवारचा दिवस ऐतिहासिक कामगिरीने उजाडला. भारतीय ॲथलीट सवान बरवालने पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत अफाट चिकाटी दाखवत देशासाठी रौप्यपदक पटकावले.

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2026) भारतासाठी शनिवारचा दिवस ऐतिहासिक कामगिरीने उजाडला. भारतीय ॲथलीट सवान बरवालने पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत अफाट चिकाटी दाखवत देशासाठी रौप्यपदक पटकावले. या विजयामुळे भारताचा मॅरेथॉनमधील तब्बल ४४ वर्षांचा पदकाचा प्रदीर्घ दुष्काळ संपुष्टात आला आहे. या अत्यंत आव्हानात्मक शर्यतीत जपानच्या यामाशिताने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
२ तास ११ मिनिटांत गाठले अंतिम ध्येय
सवान बरवालने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट लय आणि वेग राखत ४२.१९५ किलोमीटरचे अंतर अवघ्या २ तास ११ मिनिटे आणि ३७ सेकंदांत पूर्ण केले. सुरुवातीपासून आघाडीच्या धावपटूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली, मात्र सवानने अखेरच्या टप्प्यात प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत भारताचे (Asian Games 2026) रौप्यपदक निश्चित केले.
भारताला आतापर्यंत मॅरेथॉनमध्ये मिळालेली पदके
१९५१ (नवी दिल्ली): पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या छोटा सिंग यांनी सुवर्ण, तर सुरत सिंग माथूर यांनी कांस्यपदक पटकावले होते.
१९८२ (नवी दिल्ली): होसूर कुकप्पा सीथारन यांनी कांस्यपदक पटकावले होते.
ऐतिहासिक खंड: १९८२ नंतर एकाही भारतीय धावपटूला या शर्यतीत पदक जिंकता आले नव्हते. सवान बरवालने थेट रौप्यपदक पटकावून हा प्रदीर्घ पदकाचा दुष्काळ अखेर संपवला.
भारतीय पथकाची स्पर्धेतील सद्यस्थिती
शुक्रवारी भारतीय खेळाडूंनी (Asian Games 2026) चमकदार कामगिरी करत खात्यात १ सुवर्ण, २ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण सहा पदके जमा केली होती. शनिवारच्या सुरुवातीलाच सवानने मिळवलेले हे रौप्यपदक ॲथलेटिक्स चमूचे मनोबल वाढवणारे ठरले आहे. मागील आशियाई स्पर्धांच्या तुलनेत यंदा भारतीय पदतालिकेची गती संथ असली, तरी मॅरेथॉनमधील या ऐतिहासिक यशामुळे क्रीडा जगतात भारताची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे.






