Sarvesh Kushare Silver : नाशिकच्या शेतकऱ्याच्या मुलाची गगनभरारी! उंच उडीत भारताला ५६ वर्षांनंतर जिंकून दिले ऐतिहासिक रौप्यपदक
Sarvesh Kushare Silver : भारताच्या सर्वेश कुशारेने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडी प्रकारात इतिहास रचला.

Asian Games 2026 Sarvesh Kushare Wins Silver Mens High Jump Ends 56 Year Drought : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) च्या ॲथलेटिक्स ट्रॅकवर महाराष्ट्राच्या सुपुत्राने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. पुरुषांच्या उंच उडी (High Jump) प्रकारात भारताचा स्टार ॲथलीट सर्वेश कुशारेने (Sarvesh Kushare) २.२५ मीटरची उत्तुंग झेप घेत रौप्यपदक (Silver Medal) पटकावले. या चंदेरी कामगिरीसह भारतीय पुरुष उंच उडीतील तब्बल ५६ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपुष्टात आला आहे. यापूर्वी १९७० च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत भीम सिंह यांनी २.०३ मीटर उडी मारून कांस्य जिंकले होते; त्यानंतर एकाही भारतीय ॲथलीटला पोडियमपर्यंत पोहोचता आले नव्हते.
गोल्ड मेडल हुकले; काउंटबॅक नियमाने चिनी ताइपेच्या खेळाडूला सुवर्ण!
अंतिम फेरीत सर्वेशने २.१०, २.१४, २.१८, २.२२ आणि २.२५ मीटरची उंची सहज पार केली. मात्र, २.२८ मीटरच्या प्रयत्नात तिन्ही वेळा त्याला अपयश आले. दुसरीकडे, चिनी ताइपेच्या चाओ-ह्सुआन फू यानेही २.२५ मीटरचीच उडी मारली; परंतु काउंटबॅक नियमांच्या (Countback rules) आधारे कमी प्रयत्नांत ती उंची गाठल्याने त्याला सुवर्ण मिळाले, तर सर्वेशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दक्षिण कोरियाचा जागतिक विजेता सांगह्योक वू (२.२२ मीटर) कांस्यपदकावर फेकला गेला.
हांगझोऊतील पराभवाचा वचपा; २०२६ कॉमनवेल्थनंतर नागोयातही चांदी!
Up and over to silver! 🥈🔥
Sarvesh Kushare clears 2.25m to finish second in the men’s high jump at #AichiNagoya2026. 🇮🇳 pic.twitter.com/LnSt3cdOVa
— Olympic Khel ™ (@OlympicKhel) September 27, 2026
२०२३ च्या हांगझोऊ आशियाई स्पर्धेत २.२६ मीटर उडी मारूनही सर्वेश चौथ्या स्थानावर राहिल्याने त्याचे पदक हुकले होते. त्या पराभवाचे शल्य त्याने नागोयात पुसून काढले. २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) रौप्यपदक जिंकल्यानंतर आता आशियाडमध्येही रौप्य पटकावून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले निर्विवाद सातत्य सिद्ध केले आहे.
मक्याच्या कुसावर उडी ते सैन्यात नायब सुभेदार; नाशिकच्या पठ्ठ्याचा प्रेरणादायी प्रवास!
नाशिक जिल्ह्यातील देवगाव येथील एका गरीब कांदा उत्पादक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सर्वेशचा इथवरचा प्रवास अंगावर काटा आणणारा आहे. लहानपणी सरावासाठी मॅट नसताना दुखापत होऊ नये म्हणून त्याचे वडील शेतातील कचरा, मक्याची टरफले आणि कापूस एकत्र करून उडी मारण्यासाठी खड्डा तयार करायचे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात सर्वेश भारतीय सैन्यात दाखल झाला आणि सध्या तो १०१ फील्ड रेजिमेंटमध्ये नायब सुभेदार म्हणून देशसेवा करत आहे.





