Harita Bhadra Bronze : अवघ्या ०.०१ सेकंदाच्या फरकाने मारली बाजी! महाराष्ट्राच्या हरिता भद्राने पदार्पणातच कांस्यपदक जिंकत रचला इतिहास
Harita Bhadra Bronze : भारतीय धावपटू हरिता भद्राने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या २०० मीटर शर्यतीत २३.२० सेकंदांची वेळ नोंदवून कांस्य पदक जिंकले.

Asian Games 2026 Harita Bhadra Wins Bronze In Womens 200m Race In Nagoya : जपानमध्ये होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये रविवारी भारतासाठी ॲथलेटिक्स ट्रॅकवरून अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. नवी मुंबईची कन्या आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी धावपटू हरिता भद्राने (Harita Bhadra) महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या अंतिम फेरीत सेकंदाच्या १०० व्या भागाच्या (०.०१ सेकंद) फरकाने अत्यंत थरारक कांस्यपदक (Bronze Medal) पटकावले. हरिताने २३.२० सेकंदांत शर्यत पूर्ण करत तिसरे स्थान मिळवले, तर जपानची इडो अबिगेइरुफुका २३.२१ सेकंदांसह चौथ्या स्थानावर फेकली गेली.
सिंगापूरला सुवर्ण तर चीनला रौप्य; भारताची उन्नती सहाव्या स्थानी!
या अंतिम शर्यतीत सिंगापूरच्या शांती परेराने २२.७८ सेकंदांसह सुवर्ण, तर चीनच्या चेन युजीने २२.९३ सेकंदांसह रौप्यपदक पटकावले. याच शर्यतीत भारताची दुसरी ॲथलीट उन्नती अयप्पा बोलँड २३.४८ सेकंदांच्या वेळेसह सहाव्या क्रमांकावर राहिली. पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या हरिताने पदार्पणातच पदकावर नाव कोरत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा आणि महाराष्ट्राचा तिरंगा अभिमानाने फडकवला.
१०० मीटरमध्ये इतिहास; देशातील दुसरी सर्वात वेगवान महिला!
Congratulations to Harita Bhadra on clinching the Bronze Medal in the Women’s 200m Final at the #AsianGames2026.#Cheer4Bharat pic.twitter.com/3Jtfh8Cmxk
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) September 27, 2026
२०२६ चे वर्ष हरिताच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम पर्व ठरले आहे. आंतरराज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने २३.१४ सेकंदांच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह सुवर्ण जिंकून आशियाडचे तिकीट पक्के केले होते. त्यानंतर नवी दिल्लीतील इंडियन ॲथलेटिक्स सीरिजच्या फायनलमध्ये तिने १०० मीटर शर्यत अवघ्या ११.२२ सेकंदांत पूर्ण करून सुवर्ण पटकावले. भारतीय महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या इतिहासातील ही दुसरी सर्वात वेगवान वेळ ठरली. सुरुवातीला तिने ६० मीटर नॅशनल इनडोअर चॅम्पियनशिपमध्ये ७.३२ सेकंदांसह राष्ट्रीय विजेतेपदही जिंकले होते.
ट्रॅकवर सुसाट अन् बिझनेसमध्येही बॉस; चालवते ‘दागीना’ ज्वेलरी ब्रँड!
क्रीडांगणावर वेगाचे नवनवे विक्रम रचण्यासोबतच हरिता एक यशस्वी उद्योजिका (Entrepreneur) देखील आहे. खेळाचा व्यस्त दिनक्रम सांभाळून तिने ‘दागीना’ (Dagina) नावाचा स्वतःचा अँटी-टार्निश ज्वेलरी ब्रँड सुरू केला असून तो लोकप्रिय ठरत आहे. ट्रॅक आणि बिझनेस दोन्ही आघाड्यांवर ठसा उमटवणारी हरिता आजच्या तरुण पिढीसाठी एक आदर्श ठरली आहे.





