Asian Games 2023 : आयत्यावेळी ‘उमरान मलिक’चा भारतीय संघात समावेश..

नवी दिल्ली :- नवोदित वेगवान गोलंदाज उमरान मलिक याचा भारतीय संघात समावेश होणार असून हा संघ आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे. संघाचे सराव शिबिर सुरू होण्यापूर्वीच शिवम मावी याला दुखापत झाल्यामुळे आयत्यावेळी मलिकचा संघात समावेश करण्यात आला आहे.
चीनमधील हांगझू येथे येत्या 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरदरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धा होणार असून यंदा त्यात टी-20 क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी भारताचे पुरुष व महिला हे दोन्ही संघ सहभागी होणार आहेत. भारताची या स्पर्धेत आपली मोहीम 28 सप्टेंबरला सुरू करणार असून महिला संघ 19 ते 28 सप्टेंबरपर्यंत हे सामने खेळेल.
दरम्यान,भारताच्या पुरुष संघाचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे.भारतीय पुरुष संघाला आयसीसी टी-20 मधील क्रमवारीच्या आधारे थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले आहे. टीम इंडियाचा उपांत्यपूर्व सामना 5 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा पार पडत असताना दुसरीकडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. त्यामुळे भारतासह अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे दुय्यम संघच या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अशा स्थितीत भारतासाठी विजय अधिक सोपा होऊ शकतो.





