Asian Athletics Championships : आशियाई ॲथलेटिक्समध्ये भारत तिसऱ्या स्थानी, 27 पदकांची कमाई..

बॅंकॉक :- भारताच्या खेळाडूंनी 27 पदकांची कमाई केली असली तरीही येथे पार पडलेल्या आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
पुरुषांच्या 4-400 मीटर रिले शर्यतीत भारतीय संघाने रजतपदक पटकावले. या पदकासह भारतीय पथकाने या स्पर्धेत एकूण 27 पदके मिळवली. त्यात 6 सुवर्ण, 12 रजत तर, 9 ब्रॉंझपदकांचा समावेश आहे.
आजवरची भारतीय खेळाडूंची या स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी ठरली आहे. यापूर्वी यजमानपद भूषविताना 2017 साली भुवनेश्वरला झालेल्या स्पर्धेत भारताने 9 सुवर्णपदकांसह एकूण 27 पदके मिळवली होती. भारताने परदेशात 1985 साली जकार्ता येथे झालेल्या स्पर्धेत 10 सुवर्णांसह 22 पदके जिंकली होती.
जपानने 37 पदकांसह पहिले तर, चीनने 22 पदकांसह दुसरे स्थान मिळविले. चीनने भारतापेक्षा दोन सुवर्णपदके जास्त मिळवल्यामुळे पदकतालिकेत त्यांचे स्थान दुसरे राहिले.
भारताने महिलांच्या गोळाफेक व 20 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पदक जिंकले. महाराष्ट्राच्या आभा खटुआने गोळाफेकीत चौथ्या प्रयत्नात 18.06 मीटर अंतरावर गोळा फेकला आणि रजतपदक निश्चित केले.
या कामगिरीमुळे स्पर्धेच्या इतिहासात महिला गोळाफेकीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. डोपिंगची शिक्षा संपल्यावर पुनरागमन करणाऱ्या मनप्रीत कौरने 17 मीटर कामगिरीसह ब्रॉंझपदक मिळवले.
ऐश्वर्याचे वर्चस्व…
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऐश्वर्या मिश्राने 400 मीटरमध्ये ब्रॉंझ, मिश्र रिलेत सुवर्ण व 4 बाय 400 रिलेत ब्रॉंझ अशा तीन पदकांची कमाई केली. पारुल चौधरी व ज्योती यराजी यांनी स्पर्धेत प्रत्येकी दोन रजतपदके प्राप्त करत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पारुल चौधरीने पाच हजार मीटर शर्यतीत रजतपदकाचीही कमाई केली. तिने 15 मिनिटे 52.35 सेकंद अशी वेळ दिली. अंकिताला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. 100 मीटर अडथळ्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावलेल्या ज्योती यराजीने 200 मीटर शर्यतीत रजतपदक मिळवले.





