#AsiaCup2023 Super-4 #INDVvSL : श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव करत Team India ची अंतिम फेरीत धडक

Asia Cup 2023 Super-4 India vs Sri Lanka : आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीत भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. आता भारताचा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. मात्र, याआधी टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध सामना खेळायचा आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 49.1 षटकात 213 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 41.3 षटकांत 172 धावांवर गारद झाला.
भारताकडून फलंदाजीत कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 53 धावा केल्या. राहुलने 39 आणि किशनने 33 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून दुनिथ वेलालगेने पाच आणि चरिथ असलंकाने चार विकेट घेतल्या.
श्रीलंकेच्या डावात ड्युनिथ वेलालगेने सर्वाधिक 42 धावा केल्या. धनंजय डी सिल्वाने 41 धावांचे योगदान दिले. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन बळी घेतले.
रोहितच्या दहा हजार धावा पूर्ण…
रोहितने 48 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 53 धावा केल्या. आशिया चषक स्पर्धेत त्याने सलग तिसऱ्या डावात अर्धशतक झळकावले आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 धावाही पूर्ण केल्या. हे त्याचे वनडेतील 51 वे अर्धशतक होते.
अंतिम फेरीत भारताचा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील विजेत्याशी होण्याची शक्यता आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास समीकरण बदलू शकते, मात्र बांगलादेशचा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला असून भारतीय संघाचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले आहे.





