#AsiaCup2023 Super-4 #INDvPAK : भारत-पाकिस्तान यांच्यात सुपर-4 चा आज महामुकाबला

कोलंबो :- भारत-पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ आशिया करंडकाच्या आर.प्रेमदासा स्टेडिअमवर(दुपारी 3 वा.) होणाऱ्या सुपर-4 सामन्यात पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.
लक्षवेधी
– पाकिस्तानच्या डावखुर्या शाहिन आफ्रिदी-हरिस रौफचे आव्हान
– भारताला पॉवरप्लेमध्ये कामगिरी सुधारावी लागणार
– पावसाच्या व्यत्ययामुळे एक दिवस राखीव
– विराट कोहलीच्या श्रीलंकन खेळाडूंना टिप्स
– पाकिस्तान चार वेगवान गोलंदाजांसह उतरणार
– पावसामुळे नाणेफेकीच्या कौलाकडे लक्ष
पहिल्या सामन्यात शाहिन आफ्रिदी व हरिस रौफ या गोलंदाजांच्या वेगवान माऱ्याने भारताच्या अव्वल फलंदाजांना छळले होते. त्यामुळे या हायहोल्टेज सामन्यात पाकिस्तानच्या वेगवान माऱ्यासमोर टिकण्याचे आव्हान भारतीय फलंदाजांसमोर असणार आहे.
यापूर्वीच्या सामन्यात अव्वल फलंदजांनी निराशा केल्यानंतर इशान किशन व हार्दिक पंड्या या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी चांगली फलंदाजी करताना भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. अखेर सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने भारतावरील पराभवाची नामूष्की टळली होती.
आजच्या सामन्यातही कोलंबोमध्ये 90टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, त्यामुळे कर्णधार रोहित नाणेफेकीच्या कौलानंतर काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. पहिल्या सामन्यात पावसाने प्रेक्षकांच्या उत्साहाच्या रंगाचा बेरंग केल्याने या सामन्यात तरी वरूनराजाने न पावण्याची प्रेक्षकांची इच्छा असणार आहे.
पाकिस्तानने या सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. परंतू भारताकडून प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतो. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येऊ शकतो. बुमराह वैयक्तिक कारणास्तव श्रीलंकेतून भारतात परतला होता. यामुळे तो नेपाळविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही. पण आता तो परत येऊ शकतो. तर अक्षर पटेललाही संधी मिळू शकते. अक्षरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्यास शार्दुल ठाकूरला विश्रांती दिली जाऊ शकते. यासह मोहम्मद सिराजस, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव यांच्याकडेही लक्ष असणार आहे.
नवाजच्या ऐवजी फहीम अश्रफ…
भारताविरुद्धच्या सुपर-4 फेरीच्या सामन्यासाठी पाकिस्तानने आपला संघ शनिवारीच जाहीर केला. त्यामध्ये पाकिस्तानने चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कर्णधार बाबर आझमने फिरकीपटू मोहम्मद नवाज ऐवजी वेगवान गोलंदाज फहीम अश्रफला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. त्यामुळे याही सामन्यात पाक आपल्या वेगवान गोलंदाजीने भारतीय फलंदाजांवर आक्रमण करताना दिसणार आहे. अश्रफसह शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ ही वेगवान गोलंदाजांची तिकडी भारताच्या फलंदाजांना पुन्हा छळू शकते. यांच्यासह शादाब खान प्रमुख फिरकी गोलंदाज असेल.
भारतापेक्षा आम्ही सरस- बाबर
आमचा संघ श्रीलंकेच्या भूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. आमच्या खेळाडूंना श्रीलंकेतील खेळपट्यांची व परिस्थितीची चांगली जाणीव आहे. त्यामुळे या परिस्थितीत आम्ही भारतापेक्षा नक्कीच सरस ठरतो, असे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताविरुद्धच्या सुपर-4 सामन्यापूर्वी बोलताना म्हटले. याशिवाय संघाच्या गोलंदाजी व फलंदाजीबद्दल बोलताना बाबर पुढे म्हणाला, नवीन चेंडूने आम्ही नेहमीच चांगली सुरुवात केली आहे. याशिवाय आमच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी दाखवली. आमच्या गोलंदाजांना मधल्या षटकांमध्ये विकेट्स काढता येत नाहीत. पण शेवटच्या षटकांमध्ये आम्ही शानदार गोलंदाजी करत आहोत हे तुम्हाला दिसेल. कोणताही खेळाडू अपयशी ठरला तर इतर खेळाडू त्याची भरपाई करत असतात. ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे, असेही त्याने पुढे म्हटले.
राहुल “इन’ संजू “आऊट’
के.एल. राहुलने कोलंबो गाठत फलंदाजी सराव सुरु केल्यानंतर संघाचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन संघ सोडून भारतात परतला आहे. राहुलच्या फिटनेसबाबत संघ व्यवस्थापनाला शंका होती, त्यामुळे सॅमसनला राखीव म्हणून आशिया करंडकाच्या संघात स्थान देण्यात आले होते. त्यामुळे राहुलची संघात एंट्री झाल्यानंतर संघ व्यवस्थापनाकडून सॅमसनला माघारी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राहुलने महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीचा सामना करण्यासाठी डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध सराव करताना दिसला.
दोन्ही संघ Playing 11चे संभाव्य खेळाङू :-
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर/केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, शादाब खान (उपकर्णधार), इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ.






