Asia Cup Trophy : मी ट्रॉफी परत देणार, पण…; भारतासमोर मोहसीन नक्वी यांनी ठेवली ‘ही’ संतापजनक अट

यंदाच्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पाच विकेट्स राखून पराभूत करत विजेतेपद मिळवलं. मात्र, सामन्यानंतरचा नाट्यमय प्रसंग क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात कायम राहणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) प्रमुख आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वी यांनी विजेतेपदाची ट्रॉफी आणि इतर पदकांसह स्टेडियम सोडलं, ज्यामुळे भारतीय संघाला ट्रॉफीशिवाय परत जावं लागलं. नक्वी यांच्या या कृतीमुळे क्रिकेट विश्वात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या असून, आता त्यांनी ट्रॉफी परत देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी एक आश्चर्यकारक अट ठेवली आहे, ज्यामुळे हा वाद आणखी तापला आहे.
काय आहे नक्वींची अट ?
क्रिकबझ या प्रमुख क्रिकेट वेबसाइटनुसार, मोहसीन नक्वी यांनी भारताला आशिया चषक ट्रॉफी आणि इतर पदकं परत देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “ट्रॉफी आणि मेडल्स मी स्वतः भारताला देईन, पण त्यासाठी एक औपचारिक कार्यक्रम (फॉर्मल फंक्शन) आयोजित करावा लागेल,” अशी अट नक्वी यांनी ठेवली आहे. हा कार्यक्रम एसीसीच्या प्रमुख म्हणून त्यांच्या भूमिकेच्या अनुषंगाने असावं, असं त्यांचं म्हणणं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध अतिशय ताणलेले असल्याने ही अट मान्य होण्याची शक्यता अत्यल्प आहे. सोशल मीडियावर तर नक्वींना “ट्रॉफी चोर” म्हणून टोमणा मारला जात आहे, तर भारतीय चाहते काल्पनिक ट्रॉफीसह सेलिब्रेशन करत आहेत.
मैदानावर घडलेलं नाट्य: ट्रॉफी हस्तांतरणावरून एक तासाचा विलंब
आशिया चषकाचा अंतिम सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झाला. भारताने पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभूत केलं, पण सामन्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा सुमारे एक तास उशिरा सुरू झाला. भारतीय संघाने सुरवातीपासूनच स्पष्ट केलं होतं की, एसीसी प्रमुख नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही. कारण, नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) प्रमुख आणि अंतर्गत मंत्री असल्याने त्यांच्या भूमिकेवर भारताचा विरोध होता.
नक्वी मात्र “मीच ट्रॉफी देईन,” असा हट्ट धरून मंचावर सुमारे सव्वा तास उभे राहिले. चर्चा अपयशी ठरल्यावर नक्वी यांनी ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन स्टेडियम सोडले. भारतीय खेळाडू कुलदीप यादव, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी वैयक्तिक पुरस्कार इतर अधिकाऱ्यांकडून स्वीकारले, पण नक्वींकडे दुर्लक्ष केलं. सोहळा संपल्यावर भारतीय संघ ट्रॉफीशिवाय हॉटेलला परतला, तर नक्वींनी ट्रॉफी एसीसी मुख्यालयात ठेवली आहे.
बीसीसीआयची कठोर भूमिका: आयसीसीत तक्रार करणार
या घटनेवर बीसीसीआयने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांनी म्हटलं, “नक्वींना ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन जाण्याचा काहीही अधिकार नाही. आम्ही एसीसीच्या दुबईतील बैठकीत (३० सप्टेंबरला) आणि नोव्हेंबरमधील आयसीसी परिषदेत यावर कठोर तक्रार करणार आहोत.” बीसीसीआयने भारतीय संघाला २१ कोटी रुपयांचं बोनसही जाहीर केलं आहे. दुसरीकडे, नक्वी यांनी सोशल मीडियावर भारताच्या भूमिकेवर टीका केली असून, “खेळाच्या भावनेला अपमानित केलं गेलं,” असं म्हटलं आहे. मात्र, बीसीसीआयने पाकिस्तानशी खेळण्याच्या दीर्घकालीन विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे.





