Asia Cup : टीम इंडियाच्या सिलेक्शनमध्ये नवा ट्विस्ट! ‘या’ 5 जणांची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड

मुंबई: बीसीसीआयने आशिया कप 2025 साठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंचा भारतीय क्रिकेट संघ जाहीर केला आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी या स्पर्धेकडे महत्त्वाची संधी म्हणून पाहिले जात आहे. आशिया कपनंतर विश्वचषकापर्यंत भारतीय संघ केवळ 15 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे निवड समिती, प्रशिक्षक आणि कर्णधार विश्वचषकासाठी अंतिम संघ निश्चित करतील.
शुभमन गिलचे पुनरागमन, बुमराहचे कमबॅक
शुभमन गिलने आशिया कपसाठी भारतीय संघात पुनरागमन केले असून, त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. दुसरीकडे, 2024 टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय टी-20 सामना न खेळलेल्या जसप्रीत बुमराहचेही या संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, इंग्लंड दौऱ्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद सिराजला टी-20 संघात स्थान मिळालेले नाही.
5 स्टँडबाय खेळाडूंची घोषणा
15 खेळाडूंच्या मुख्य संघासह बीसीसीआयने पाच स्टँडबाय खेळाडूंचीही निवड केली आहे. यामध्ये प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयस्वाल यांचा समावेश आहे. मुख्य संघातील कोणत्याही खेळाडूला दुखापत झाल्यास या पाच खेळाडूंमधून एकाची निवड होईल. प्रसिद्ध कृष्णाने आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली होती. वॉशिंग्टन सुंदर आणि यशस्वी जयस्वाल यांनीही आयपीएल आणि इंग्लंड दौऱ्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना प्रभावी प्रदर्शन केले. परागने संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत काही सामन्यांमध्ये राजस्थानच्या संघाचे नेतृत्वही केले होते.
श्रेयस अय्यरला धक्का
आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्सला अंतिम फेरीपर्यंत नेणारा कर्णधार श्रेयस अय्यरला स्टँडबाय खेळाडूंच्या यादीतही स्थान मिळालेले नाही. अय्यरने आयपीएलमध्ये 50.33 च्या सरासरीने आणि 175.07 च्या स्ट्राइक रेटने 600 हून अधिक धावा केल्या होत्या. तरीही, त्याची भारतीय टी-20 संघात निवड न झाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
आशिया कप 2025 साठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षीत राणा, रिंकू सिंग.
स्टँडबाय खेळाडू
प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल.





