Asia Cup 2025 : ACC च्या निर्णयाने भारत-पाकला भरली धडकी, हायव्होल्टेज सामन्यासाठी ‘या’ वादग्रस्त अंपायरची नियुक्ती

ACC Announces Match Officials for Asia Cup 2025 : आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) 9 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या टी-20 आशिया कप 2025 स्पर्धेसाठी मॅच रेफरी आणि अंपायरांच्या पथकाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये अनुभवी मॅच रेफरी रिची रिचर्डसन आणि अँडी पायक्रॉफ्ट यांच्या नेतृत्वाखाली मॅच रेफरींचे पथक कार्यरत असेल. विशेषतः, 14 सप्टेंबर रोजी दुबईत होणाऱ्या भारत-पाकिस्तान या बहुप्रतिक्षित सामन्यासाठी अँडी पायक्रॉफ्ट यांना मॅच रेफरी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
अंपायर पथकात अनुभवी नावे –
या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 10 अंपायरांमध्ये अनेक देशांचे अनुभवी अधिकारी सामील आहेत. भारताकडून वीरेंद्र शर्मा आणि रोहन पंडित मैदानी अंपायरिंगची जबाबदारी सांभाळतील. श्रीलंकेकडून रवींद्र विमलसिरी आणि रुचिरा पल्लियागुरुगे यांना संधी मिळाली आहे. याशिवाय, अफगाणिस्तानचे अहमद पाकतीन आणि इजातुल्लाह सफी, पाकिस्तानचे आसिफ याकूब आणि फैसल अफरीदी, तसेच बांगलादेशचे गाजी सोहेल आणि मसूदुर रहमान हे देखील अंपायर पथकाचा भाग आहेत.
भारत-पाकिस्तान सामन्यासाठी विशेष नियुक्ती –
14 सप्टेंबर रोजी दुबईत होणाऱ्या भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यासाठी रुचिरा पल्लियागुरुगे आणि मसूदुर रहमान हे मैदानी अंपायर म्हणून काम पाहतील. मात्र, रुचिरा पल्लियागुरुगे यांच्या गतकालीन कामगिरीवरून त्यांच्याबाबत काही वाद निर्माण झाले आहेत. 2019च्या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज सामन्यात त्यांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले होते, ज्यामुळे वेस्ट इंडिजला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
हेही वाचा – Mohammed Siraj : ICCच्या ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकन जाहीर! सिराजसह ‘या’ तीन खेळाडूंमध्ये टक्कर
तसेच, गेल्या वर्षी श्रीलंका-भारत एकदिवसीय मालिकेतही त्यांचे काही निर्णय चुकीचे ठरले होते, जे पुनरावलोकनामुळे (रिव्ह्यू) दुरुस्त करण्यात आले. त्यामुळे त्यांची या सामन्यासाठी निवड ही कोणत्याही संघासाठी आव्हानात्मक ठरू शकते. काहींच्या मते, त्यांचे निर्णय स्टीव्ह बकनर यांच्यापेक्षाही अधिक वादग्रस्त ठरू शकतात.
हेही वाचा – Asia Cup 2025 : आशिया कपसाठी कॉमेंट्री पॅनेलची घोषणा, शास्त्री-गावस्करांसह ‘या’ दिग्गजांना मिळाले स्थान
टीम इंडिया दुबईत सरावात व्यस्त –
आशिया कप टी-20 स्पर्धा ही आशियाई संघांसाठी नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. 2026च्या टी-20 विश्वचषकापूर्वी ही स्पर्धा संघांना त्यांच्या तयारीचा अंदाज घेण्यासाठी उत्तम संधी देईल. भारतीय संघ 05 सप्टेंबर रोजी दुबईत दाखल झाला असून, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील हा संघ प्रथमच एखादी स्पर्धा खेळणार आहे. सध्या भारतीय खेळाडू दुबईत जोरदार सराव करत आहेत.





