Asia Cup 2025 : आशिया कपच्या तारखा जाहीर! भारत-पाक ‘या’ दिवशी भिडणार

Asia Cup 2025 Updates in Marathi : आशिया कप २०२४ बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे, जी सध्या खूप चर्चेत आहे. भारत या स्पर्धेत सहभागी होणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते, कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ढाकामधील आशिया कपशी संबंधित बैठकीत भाग घेण्यास नकार दिला होता. आता आशिया क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी अधिकृतपणे आशिया कप २०२५ बद्दल माहिती जाहीर केली आहे. ही स्पर्धा टी-२० स्वरूपात खेळली जाणार आहे.
आशिया कप २०२५ कधी आणि कुठे होणार?
मोहसिन नक्वी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, आशिया कप २०२५ चे आयोजन संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये होणार आहे. स्पर्धेची सुरुवात ९ सप्टेंबर २०२५ पासून होईल, तर अंतिम सामना २८ सप्टेंबर २०२५ रोजी खेळला जाईल. नक्वी यांनी असेही नमूद केले की, लवकरच संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले जाईल.
Asia Cup to be held from September 9-28 in the UAE, ACC President Mohsin Naqvi confirms. #AsiaCup pic.twitter.com/PwbfYLCOrl
— Vishesh Roy (@vroy38) July 26, 2025
भारत-पाकिस्तान सामना कधी होणार?
क्रिकबझच्या अहवालानुसार, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना आशिया कपमध्ये एकाच गटात ठेवले जाणार आहे. असे गृहीत धरले जात आहे की, हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात एकमेकांशी भिडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन संघांमध्ये कदाचित तीन सामने होऊ शकतात. एका अहवालात असेही नमूद आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीतील सामना १४ सप्टेंबर २०२५ रोजी होण्याची शक्यता आहे.
आशिया कपमध्ये आठ संघांचा असणार समावेश –
एसीसीच्या ढाका येथील बैठकीनंतर एक अहवाल समोर आला, ज्यामध्ये असे सांगितले गेले की, आशिया कप २०२५ मध्ये एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. भारत, श्रीलंका, अफगानिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान, हाँगकाँग, ओमान आणि यूएई हे संघ आशिया कपच्या ट्रॉफीसाठी लढताना दिसतील. या आठ संघांना दोन गटांमध्ये विभागले जाईल. पुढील २४ ते ४८ तासांत टूर्नामेंटच्या प्रत्येक सामन्याचे वेळापत्रक आणि मैदानाची माहिती जाहीर होऊ शकते.





