प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – खेड तालुक्यातील पाळू गावातील पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झालेल्या अश्विनी बाबुराव केदारी यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांना पत्र लिहून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे. स्व. अश्विनी केदारी या गरीब शेतकरी कुटुंबातील असून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत महिलांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्या राज्यसेवा आयोगाची मुख्य परीक्षा देऊन शासकीय सेवेत आणखी मोठे यश मिळवण्याच्या उंबरठ्यावर होत्या; मात्र 29 ऑगस्ट रोजी झालेल्या दुर्घटनेत गंभीर भाजल्याने उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. उपचारासाठी झालेला मोठा वैद्यकीय खर्च व कुटुंबातील आधारस्तंभ गमावल्याने केदारी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली आहे. या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे तातडीने मदतीची शिफारस केली आहे.मुंबई मंत्रालयातील अजितदादा पवार यांच्या कार्यालयात पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक अरुण चांभारे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर, मनोज थिगळे व स्वीय सहाय्यक सतीश कदम यांनी प्रत्यक्ष जाऊन सुपूर्द केले.