अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची निवड

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. जगभरातील चित्रपटप्रेमींमध्ये मानाचा समजला जाणारा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 15 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे.
कोण आहेत आशुतोष गोवारीकर ?
आशुतोष गोवारीकर यांनी लगान, स्वदेश, जोधा अकबर, पानिपत अशा ऑस्कर नामांकीत सिनेमांचं दिग्दर्शन केलं असून चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनातील हे मोठे नाव आहे. भारातीय सिनेमा ऑस्करपर्यंत पोहोचवणारे हे प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते आहेत. आशुतोष गोवारीकर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत मागील तीन दशकांपासून लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
कोण आयोजित करतं अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव?
नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत व मराठावाडा आर्ट कल्चर व फिल्म फाऊंडेशनच्या वतीने मागील ९ वर्षांपासून अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे आयोजीत केला जातो. केंद्र सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालय, एनएफडीसी व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं हा महोत्सव आयोजित करण्यात येतो.





