Ashtavinayak Movie : ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ एका रात्रीत लिहिलं; सचिन यांनी बदलला क्लायमॅक्स, असा घडला ‘अष्टविनायक’
Ashtavinayak Movie : ‘अष्टविनायक’ या चित्रपटाशी अनेक रंजक किस्से जोडलेले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाची कथा सत्यघटनेवर आधारित असल्याचे सांगितले जाते.

ब्लॅक अँड व्हाइट सिनेमांचा काळ मागे पडत असताना मराठी चित्रपटसृष्टीत एक असा सिनेमा आला, ज्याने आस्तिक आणि नास्तिक या दोन विचारसरणींमधील संघर्ष मांडतानाच श्रद्धेचे महत्त्व अधोरेखित केले. १९७९ मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा आजही टेलिव्हिजनवर लागला की प्रेक्षक आवडीने पाहतात. या सिनेमातील ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ हे गाणे तर अजरामर झाले आहे. गणेशोत्सवाला सुरुवात झाली की या गाण्याची आठवण हमखास होते. ‘अष्टविनायक’ या चित्रपटाशी अनेक रंजक किस्से जोडलेले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाची कथा सत्यघटनेवर आधारित असल्याचे सांगितले जाते.
आस्तिक आणि नास्तिक विचारांचा संघर्ष
‘अष्टविनायक’ हा आस्तिक आणि नास्तिक या दोन विचारसरणींमधील संघर्षाचा एक सुंदर सुवर्णमध्य म्हणता येईल. १९७५ मध्ये सांगलीतील एका कुटुंबात घडलेल्या घटनेवरून या चित्रपटाची कथा रचण्यात आली.
चित्रपटातील बाळासाहेब इनामदार अर्थात बाळची व्यक्तिरेखा सचिन पिळगावकर यांनी साकारली आहे. मिलमालक चंद्रकांत यांचा परदेशातून शिक्षण घेऊन आलेला हा एकुलता एक मुलगा. मनाने नितळ आणि प्रामाणिक असला, तरी नियम आणि तत्त्वांबाबत अत्यंत कठोर. आईचे अकाली निधन झाल्याने त्याचा देव आणि श्रद्धेवरील विश्वास उडालेला असतो. त्यामुळे तो नास्तिक बनलेला असतो.
वडील मिलची जबाबदारी बाळकडे सोपवतात. आपल्या आधुनिक कार्यपद्धतीनुसार बाळ मिलमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेला गणेशोत्सव बंद करण्याचा निर्णय घेतो. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरते. मात्र, बाळ आपल्या निर्णयावर ठाम राहतो. त्यानंतर वडिलांचे निधन होते आणि बाळच्या आयुष्यातील संघर्ष आणखी तीव्र होतो.
वीणाच्या रूपाने बाळच्या आयुष्यात श्रद्धेची एन्ट्री
एका कामानिमित्त बाहेरगावी गेलेला बाळ पावसात अडकतो आणि त्याची भेट वीणाशी होते. वंदना पंडित यांनी साकारलेली वीणा ही बाळच्या अगदी विरुद्ध स्वभावाची. ती देवभक्त, आस्तिक, गुणी आणि सालस असते. शिवाय आपल्या वडिलांप्रमाणेच तिच्या गळ्यातही सुरांची श्रीमंती असते.
बाळ वीणाच्या प्रेमात पडतो. वडिलांचे जिवलग मित्र साठेकाका अर्थात शरद तळवळकर यांच्या मदतीने दोघांचे लग्नही होते. सुरुवातीचे नवलाईचे दिवस सुखात जातात. मात्र, त्यानंतर त्यांच्या संसारात आस्तिक आणि नास्तिक या दोन विचारसरणींमधील संघर्षाला सुरुवात होते.
गणेशमंदिर हलवण्याचा निर्णय आणि संसारात दुरावा
मिलच्या विस्तारासाठी अनेक वर्षांपासून कामगारांचे श्रद्धास्थान असलेले गणेशमंदिर त्याच्या मूळ जागेवरून हलवण्याचा निर्णय बाळ घेतो. मात्र, या निर्णयाला वीणा कडाडून विरोध करते. प्रसंगी ती आपल्या पतीच्या विरोधातही उभी राहते.
एका बाजूला बाळचा तर्क आणि नास्तिक विचार, तर दुसऱ्या बाजूला वीणेची श्रद्धा आणि गणपतीवरील अढळ विश्वास. या संघर्षामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो. अबोला वाढत जातो. त्यातच वीणाचे मिसकॅरेज होते.
एकीकडे वैयक्तिक आयुष्यात संकटे सुरू असताना दुसरीकडे मिललाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. मिलमध्ये आग लागते आणि बाळसमोर संकटांची मालिकाच उभी राहते.
अपूर्ण नवसाची आठवण आणि अष्टविनायक यात्रा
याच वेळी साठेकाका वीणाला तिच्या अपूर्ण राहिलेल्या नवसाची आठवण करून देता. अष्टविनायक यात्रा करण्याचा नवस. विशेष म्हणजे ही यात्रा तिने पतीसोबत करण्याचा संकल्प केलेला असतो.
वीणाच्या आग्रहाला मान देत बाळ केवळ तिच्या इच्छेखातर तिच्यासोबत अष्टविनायक यात्रा करण्यास तयार होतो. या यात्रेदरम्यान त्याच्या विचारांमध्ये होणारा बदल आणि श्रद्धेचा अनुभव हा चित्रपटाचा महत्त्वाचा भाग ठरतो. यात्रेच्या अखेरीस बाळच्या आयुष्यातील गेलेले वैभव पुन्हा परत येते.
मात्र, हा चित्रपट केवळ देवावरील श्रद्धेची कथा नाही. आस्तिक आणि नास्तिक या दोन वृत्तींकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी तो देतो. श्रद्धा, तर्क, नातेसंबंध आणि संकटाच्या काळात माणसाचा मानसिक आधार यांसारखे अनेक प्रश्न हा सिनेमा प्रेक्षकांसमोर ठेवतो.
‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ची भन्नाट कहाणी
‘अष्टविनायक’ची सर्वात मोठी ओळख म्हणजे ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ हे अजरामर गाणे प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांनी हे गाणे लिहिले.या गाण्याशी संबंधित एक रंजक किस्साही सांगितला जातो. गाणे लिहिण्यापूर्वी खेबुडकर यांनी स्वतः अष्टविनायकाची प्रत्यक्ष यात्रा केलेली नव्हती. तरीही निर्माते शरद पिळगावकर यांच्या सांगण्यावरून त्यांनी एका रात्रीत अष्टविनायकाच्या आठही गणपतींचे वैशिष्ट्य आणि महिमा शब्दबद्ध केला. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष मंदिरदर्शन न घेताही त्यांनी लिहिलेले हे गाणे पुढे अजरामर झाले. आजही गणेशोत्सवाच्या काळात हे गाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऐकायला मिळते.
सचिन पिळगावकरांचा पहिलाच सिनेमा आणि क्लायमॅक्सचा किस्सा
या सिनेमाचे निर्माते शरद पिळगावकर हे अभिनेते सचिन पिळगावकर यांचे वडील. अष्टविनायकावर आधारित एक मोठा चित्रपट व्हावा, अशी कल्पना त्यांच्या मनात होती. त्यातून ‘अष्टविनायक’ साकारला आणि बाळची मुख्य भूमिका सचिन पिळगावकर यांनी केली.
त्या काळात सचिन नवखे कलाकार होते. मात्र, त्यांच्या अभिनयात कुठेही नवखेपणाचा लवलेश जाणवत नाही. बाळच्या व्यक्तिरेखेतील तर्क, हट्ट, भावनिक संघर्ष आणि नंतर होणारा मानसिक बदल त्यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारला.
चित्रपटाच्या मूळ संहितेतील शेवट मात्र वेगळा असल्याचे सांगितले जाते. मुख्य अभिनेता म्हणून काम करताना सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शक राजदत्त आणि निर्मात्यांसमोर क्लायमॅक्समध्ये काही महत्त्वाचे बदल सुचवले. त्यांच्या सूचनांनुसार शेवटामध्ये बदल करण्यात आला.
हा बदललेला क्लायमॅक्स प्रेक्षकांच्या मनाला इतका भिडला की चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि ‘अष्टविनायक’ बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.
आज अनेक दशकांनंतरही ‘अष्टविनायक’चा विषय आणि त्यातील गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. आस्तिक-नास्तिकतेच्या संघर्षातून श्रद्धा, नातेसंबंध आणि माणसाच्या भावविश्वाचा घेतलेला वेध हीच या चित्रपटाची खरी ताकद आहे. आणि म्हणूनच ‘अष्टविनायक’ हा केवळ एक सिनेमा न राहता मराठी प्रेक्षकांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग बनला आहे.
Asha Buchke : जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशा बुचके यांचे निधन; जुन्नर तालुक्यावर शोककळा





