Ganesh festival 2025 | Ashok Saraf : कलर्स मराठीवरील अशोक मामा मालिकेत गरज पडली तेव्हा कुटुंबासाठी खंबीरपणे उभे राहणारे अशोक आता मानसिकरीत्या खचलेले आहेत आणि त्यांना सावरायचा प्रयत्न भैरवी करतेय. पण घरातील वातावरण अजूनही तणावग्रस्त आहे. अनिशचा आत्मविश्वास डळमळीत झालाय, त्याचा ताण त्याच्या वागण्यात दिसू लागलाय. भीतीमुळे तो देव-देव करण्यात गुंतून जातो, ज्यामुळे त्याचे आणि भैरवीचे छोटे छोटे वाद अधिकच चिघळतात. पण आता विघ्नहर्ता गणपतीच्या आगमनाने त्याच्या आशीर्वादाने सगळी काही सुरळीत होवो हीच ईश्वर चरणी भैरवीची प्रार्थना आहे. दरम्यान, वेणूचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशोक मुलांच्या मदतीने आपल्या बहिणीचा शोध घेऊ लागतो. याचवेळी गणेशोत्सवाची तयारी सुरू होते. मुलांना आरत्या शिकवत असताना सोसायटीत इको-फ्रेंडली मूर्ती घ्यावी की पीओपी यावरून वाद होतो. त्यावेळी अशोक मामा बजावून सांगतात शाडूची मूर्ती हवी पीओपी नाही चालणार. भैरवीला कळतं की अशोकला स्वतः मूर्ती बनवण्याचा जुना छंद आहे. ती मुलांच्या मदतीने त्याला पुन्हा हात मातीला लावण्यासाठी प्रोत्साहित करते, आणि अखेर यावर्षीची सोसायटीची मूर्ती अशोक मामांच्या हातून घडवली जाते. गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे, पण विसर्जनानंतरच्या हिशोबात काही गडबड उघड होते आणि संशय कुणावर जातोय, यावरून पुन्हा घरात खळबळ उडते. अशोकच्या बहिणीच्या शोधाचा प्रवास एका निर्णायक टप्प्याकडे जातो, आणि त्याचवेळी अनिश आणि भैरवी यांच्यातला तणाव शिगेला पोहोचतो. अशोक मामांची वेळेत केलेली एक कृती पुढे काय वळण आणेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.