Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातच्या मालमत्तेवर टाच; ‘नोंदणी’ कार्यालयाकडून दोन दिवसांत मिळणार रिपोर्ट
Ashok Kharat : विशेष तपास पथकाकडून अशोक खरातसह पाच कुटुंबीयांच्या मालमत्तेची सखोल चौकशी; नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून मागवला अधिकृत अहवाल.

Ashok Kharat – भोंदूगिरीच्या नावाखाली कोट्यवधींची माया जमवणाऱ्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. खरात याच्या आर्थिक नाड्या आवळण्यास विशेष तपास पथकाने सुरुवात केली असून, त्याच्यासह कुटुंबातील पाच सदस्यांच्या मालमत्तेची कुंडली आता बाहेर काढली जात आहे. त्यादृष्टीने आता विशेष तपास पथकाने नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून अशोक खरात याच्यासह त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांची जमीन, सदनिका, दुकाने आदी स्थावर मालमत्तेची माहिती मागविली आहे.
त्यानुसार नोंदणी कार्यालयाकडून खरात याच्या राज्यभरातील मालमत्तांचा शोध सुरू केला आहे. विशेष तपास पथकाने दिलेल्या पत्रानुसार, केवळ नाशिकच नव्हे, तर राज्यभरात खरात परिवाराने कुठे-कुठे गुंतवणूक केली आहे, याची माहिती गोळा केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, खरात याने भोंदूगिरीच्या माध्यमातून गोळा केलेल्या पैशांतून मोठी आर्थिक माया जमा केल्याची चर्चा आहे.
एसआयटीच्या हाती आधीच काही मालमत्तांची कागदपत्रे लागली असून, आता नोंदणी विभागाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीमुळे या मालमत्तांची व्याप्ती स्पष्ट होणार आहे. खरात कुटुंबाच्या मालमत्तेचा संपूर्ण अहवाल येत्या दोन ते तीन दिवसांत विशेष तपास पथकाकडे सोपविला जाणार आहे. हा अहवाल प्राप्त होताच पोलीस प्रशासनाकडून या सर्व बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्याची किंवा त्यावर टाच आणण्याची दाट शक्यता आहे.





