Ashok Gehlot : …तर निवडणुका निरर्थक ठरतील; अशोक गेहलोत यांचा इशारा
विरोधकांना कमजोर बनवण्यासाठी भाजपकडून मतदारसंघ फेररचना, मतदारयाद्या पडताळणीचा (एसआयआर) वापर केला जात आहे, असा आरोप राजस्थानचे माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी सोमवारी केला.

Ashok Gehlot : विरोधकांना कमजोर बनवण्यासाठी भाजपकडून मतदारसंघ फेररचना, मतदारयाद्या पडताळणीचा (एसआयआर) वापर केला जात आहे, असा आरोप राजस्थानचे माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी सोमवारी केला. तसेच, भाजपने वर्ष २०२९ मध्ये केंद्रातील सत्ता राखल्यास निवडणुका निरर्थक ठरतील, असा इशाराही त्यांनी दिला.
मतदारसंघ फेररचना हा एसआयआर इतकाच मोठा मुद्दा आहे. एसआयआर प्रमाणेच मतदारसंघ फेररचनाही देशासाठी घातक स्वरूपाची आहे. मतदारसंघांची संख्या वाढवण्याचे समर्थन करण्यासाठी भाजप महिला आरक्षणाचे कारण पुढे करत आहे.
त्या पक्षाला देशभरात मतदारसंघ फेररचना करण्यात आणि केंद्रातील सत्ता राखण्यात यश मिळाले; तर पुन्हा पारदर्शक निवडणुका होतील का याविषयी मला साशंकता वाटते, अशी परखड भूमिका गेहलोत (Ashok Gehlot) यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.
काही देशांत केवळ कागदोपत्री दाखवण्यापुरत्या निवडणुका होतात. तिथे विरोधक केवळ नावापुरते असतात. तशीच परिस्थिती भारतातही निर्माण होऊ शकते. समान व्यक्तींकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नियंत्रण राहिल्यास लोकशाही, राज्यघटनेचे काय होईल, अशी विचारणाही त्यांनी (Ashok Gehlot) केली.






