Ashok Chavan Meet Manoj Jarange : मनोज जरांगे आणि चव्हाणांमध्ये बंद दाराआड चर्चा

Ashok Chavan Meet Manoj Jarange Patil – मराठा आंदोलनक मनोज जरांगे यांची आज शनिवारपासून शांतता रॅली सुरू झाली आहे. त्यापूर्वीच भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी जरांगे यांची अंतरवाली सराटी गावात भेट घेतली आहे. या दोघांमध्ये अंतरवाली सराटीचे सरपंच यांच्या घरात बंद दाराआड दोन तास चर्चा झाली आहे. यावेळी शिवसेना (शिंदे गट) खासदार संदीपान भुमरे देखील उपस्थित होते.
या भेटीनंतर खासदार अशोक चव्हाण आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. प्रसार माध्यमांसमोर जरांगे यांनी या भेटीमध्ये नेमकी कशाबाबत चर्चा झाली? याबाबतची माहिती दिली. मनोज जरांगे म्हणाले, अशोक चव्हाण हे सरकार, समाज किंवा माध्यम म्हणून आलेत का? हा विषय महत्त्वाचा नाही. त्यांच्या माध्यमातून चर्चा सुरू राहिल आणि बाकी आमच्या मागण्याबाबत पाठपुरावाही सुरूच राहणार आहे. सगेसोयरेची आमच्या व्याख्येप्रमाणे अंमलबजावणी, हैदराबाद गॅजेट आणि सरसकट गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
अशोक चव्हाण म्हणाले, आमच्या सर्वांची इच्छा आहे हा विषय जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढा संपलेला बरा. आमच्या चर्चेत राजकीय चर्चेचा विषयच नव्हता. शासन आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वयाची आवश्यकता आहे. सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वय आवश्यक असून हा विषय लवकर संपवा, अशी आमची भावना असल्याने संवाद होण्याच्या कारणाने आपण त्यांच्या भेटीला आल्याची माहिती चव्हाणांनी प्रसार माध्यमांना दिली.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेली 13 जुलैची वेळ संपण्याला केवळ आठवडा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारकडून हालचालींना वेग आल्याचे दिसून येते आहे. तर आजपासून मनोज जरांगे शांतता रॅली काढणार आहे. त्यामुळेच की काय पण अशोक चव्हाण यांनी त्यांची समजूत काढण्यासाठी ही भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे.
शिंदे समिती हैदराबादच्या दौऱ्यावर
येत्या सोमवारी शिंदे समिती हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहे. शिंदे समितीचा हा 4 दिवसांचा हैदराबाद दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये शिंदे समिती मनोज जरांगेंच्या हैदराबाद गॅझेटच्या मागणीबाबत पुरावे गोळा करण्यात येणार आहेत. या कामात मदत करावी अशी विनंती राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी तेलंगणाच्या मुख्य सचिवांना पत्र देऊन केली आहे.





