मुंबई – राज्याचे मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर ‘भोंगे मुक्त मुंबई’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी जोरदार टीका केली. ‘आम्ही हिंदुत्ववादी असल्याच्या घोषणा शिवाजी पार्कवर केल्या, पण यांचे हिंदुत्व काँग्रेसच्या टिळक भवनापर्यंत पोहोचताना विरले,’ असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. शेलार यांनी ठाकरे बंधूंना थेट प्रश्न विचारला, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईसाठी नेमके काय केले?” ते म्हणाले, उद्धव ठाकरे आज ‘फोटो आणि ऑनलाइनच्या पलीकडे’ दिसत नाहीत. मुंबईत बॉम्बस्फोट झाले तेव्हा भाजप आणि किरीट सोमैया यांनी जखमींना मदत केली. मुंबईच्या प्रश्नांवर काम करण्याऐवजी ठाकरे बंधू केवळ टीका करण्यापुरते मर्यादित राहिले. रझा अकादमीच्या भेटीवरून त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले, ‘आझाद मैदानात पोलिसांवर हल्ले करणाऱ्या रझा अकादमीच्या प्रतिनिधींना का भेटलात?’ तसेच, रझा अकादमीवर मोर्चा काढणारे राज ठाकरे आता सोबत बसले आहेत, हेच का हिंदुत्व, असा सवाल त्यांनी केला. ‘२५ वर्षे तुमचा महापौर असूनही मुंबईतील अनेक भागांची परिस्थिती सुधारली नाही,’ असे म्हणत शेलार यांनी ठाकरे गटाच्या प्रशासकीय कारभारावर टीका केली. ‘आम्ही मुंबईचे चौकीदार आहोत, आम्हाला मुंबईचा विकास आणि नागरिकांची सोय महत्त्वाची आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.