Ashish Shelar : नारळीकरांच्या नावे एसआयएसी सुरु करणार; मंत्री ॲड. आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत २०१५ पासून राज्यात काही जिल्ह्यांमध्ये विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र (एसआयएसी) स्थापन केले आहेत. आता उर्वरित २३ जिल्ह्यांमध्ये एसआयएसी केंद्रे व २८ नवीन टेक्नॉलॉजी लॅब्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एकूण ५ वर्षाच्या कालावधीत ही केंद्रे निर्माण करण्यात येणार आहेत, अशी घोषणा माहिती-तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत एका निवेदनाद्वारे केली. त्यासाठी राज्य शासनावर अंदाजे १९२ कोटी रुपयांचा आर्थिक भार अपेक्षित आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
भारतीय राज्यघटनेत नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे हे एक मूलभूत कर्तव्य मानले आहे. त्या पार्श्वभूमीवर, शालेय वयातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड व कुतूहल वाढविण्यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत २०१५ पासून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यांमध्ये विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र स्थापन केले आहेत. ही योजना यापुढे आता थोर शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नावे चालविण्यात येणार आहे.
अशा प्रकारची सर्व केंद्र शालेय शिक्षणाशी संबंधित शैक्षणिक संस्था यांच्या भागिदारीतून आणि राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेचे नेहरु सायन्स सेंटर, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, मुक्तांगण एक्सप्लोरेटरी आणि विज्ञान आश्रम यांच्या सहकार्यातून उभारण्यात आली आहेत. शालेय शिक्षण कार्यक्रमाला हा पूरक कार्यक्रम असून विज्ञान शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यास मदत करतो. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, एक विज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रम केंद्र उभारणे आवश्यक आहे. हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्याचा शासनाचा मानस आहे, असे शेलार यांनी सांगितले.
सध्या सुरु असलेल्या केंद्रांची स्थिती
केंद्राला भेट देणाऱ्यांची संख्या :- २,७६,८३८
केंद्रात झालेल्या शिक्षक प्रशिक्षणाच्या लाभार्थ्यांची संख्या :- २,७२८
विद्यार्थीकेंद्रीत कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांची संख्या :- ६०,९८०





