अ‍ॅशेस ऑस्ट्रेलियाकडेच; इंग्लंडवर सहज विजय

मॅंचेस्टर: गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरूद्धचा चौथ्या क्रिकेट कसोटीत 185 धावांनी विजय मिळविला आणि अ‍ॅशेस आपल्याकडेच राखण्यात यश मिळविले. या विजयासह त्यांनी पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. पाचवा सामना जरी त्यांनी गमावला तरी सध्या अ‍ॅशेस त्यांच्याकडेच असल्यामुळे त्यांनी ऍशेसवर पुन्हा आपले नाव कोरले.

विजयासाठी 383 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव 91.3 षटकांत 197 धावांत आटोपला. त्यांच्याकडून जो डेन्लीने सर्वाधिक 53 धावा केल्या. पहिल्या डावात 211 व दुसऱ्या डावात 82 धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ हा सामन्याचा मानकरी ठरला.

ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने इंग्लंडच्या रॉरी बर्न्स व जो रूट या सलामीचे जोडीस खाते उघडण्यापूर्वीच तंबूत धाडले. डेन्ली व जेसन रॉय यांनी तिसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली आणि संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 4 चौकारांसह 31 धावा करणाऱ्या रॉयला बाद करीत कमिन्सने पुन्हा धक्‍का दिला. पाठोपाठ त्याने बेन स्टोक्‍स याला बाद करीत इंग्लंडच्या डावास पुन्हा खिंडार पाडले. त्याने विजयाचा पाया रचल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनीही अचूक मारा करीत यशाचे शिखर गाठले. एका बाजूने डेन्लीने 6 चौकारांसह 53 धावा केल्या. मधल्या फळीत त्याच्या जॉनी बेअरस्टो (25), जोस बटलर (34) व क्रेग ओव्हर्टन (21) या सहकाऱ्यांचे प्रयत्न खूपच अपुरे पडले. ऑस्ट्रेलियाच्या कमिन्सने 43 धावांत 4 विकेट्‌स घेतल्या.

संक्षिप्त धावफलक-
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 8 बाद 497 घोषित व दुसरा डाव 6 बाद 186 घोषित
इंग्लंड पहिला डाव सर्वबाद 301 व दुसरा डाव 91.3 षटकांत सर्वबाद 197 (जो डेन्ली 53, जॉनी बेअरस्टो 25, जोस बटलर 34, क्रेग ओव्हर्टन 21, पॅट कमिन्स 4-43, जोश हॅझेलवुड 2-31, नॅथन लियान 2-51, मिचेल स्टार्क 1-46, मार्नुस लॅबुशाग्ने 1-9)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)