Ashadhi Wari : पालखी सोहळ्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून स्वयंसेवक नोंदणी; 6 व 7 जुलैला प्रशिक्षण
Ashadhi Wari :

Ashadhi Wari : आळंदी–पंढरपूर पालखी सोहळा २०२६च्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक शाखेने स्वयंसेवक नोंदणी सुरू केली आहे. ९ ते ११ जुलैदरम्यान पालखी सोहळ्यात वाहतूक नियोजन, नागरिकांना मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनासाठी स्वयंसेवकांची मदत घेण्यात येणार असून, इच्छुक नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी वाहतूक शाखेने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन लिंकद्वारे नोंदणी करावी. नोंदणी करताना आवश्यक माहिती अचूक भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्वयंसेवकांना त्यांच्या जबाबदाऱ्या, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा आणि समन्वय याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ६ व ७ जुलै रोजी विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पुणे शहर वाहतूक शाखेच्या येरवडा येथील कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या दोन सत्रांमध्ये होणार आहे. इच्छुक स्वयंसेवकांनी आपल्या सोयीच्या कोणत्याही दिवशी आणि सत्रात उपस्थित राहून प्रशिक्षण घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पालखी सोहळा हा पुण्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असून, या काळात लाखो वारकरी आणि भाविक शहरातून प्रवास करतात. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता, सुरळीत वाहतूक आणि प्रभावी व्यवस्थापनासाठी स्वयंसेवकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार असल्याचे वाहतूक शाखेने नमूद केले आहे.
अधिकाधिक नागरिकांनी या सेवाभावी उपक्रमात सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.




