Ashadhi Wari 2026 : विभागीय आयुक्तांकडून वाल्हे पालखी तळाची पाहणी; प्रशासकीय त्रुटींवर कडक ताशेरे!
Ashadhi Wari 2026 : विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या उपस्थितीत पुरंदर तालुक्यातील पालखी महामार्गाची पाहणी; वारीपूर्वी सर्व त्रुटी दूर करण्याचे निर्देश.

Ashadhi Wari 2026 – आषाढी वारी २०२६ साठी आळंदी येथून तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पायी पालखी सोहळा, पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामी वाल्हे (ता. पुरंदर) ग्रामपंचायत नजिक सुकलवाडी फाट्याशेजारील प्रांगणामध्ये (दि. १४ जुलै) रोजी असणार आहे. या पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचा गुरूवारी (दि.४) पालखी तळ व पालखी महामार्ग पाहणी दौरा पार पडला.
यावेळी आढळलेल्या विविध त्रुटींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा यंदा ८ जुलै रोजी श्री क्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना पालखी मार्गावरील गावांमध्ये, प्रत्यक्ष पालखी तळावर येण्यापूर्वी येथील उपलब्ध सोयी-सुविधांची पाहणी करणे, तळावरील त्रुटी, अडीअडचणी असल्यास त्यावर चर्चा करून मार्ग काढणे, हा दौऱ्याचा मुख्य उद्देश होता, असे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सांगितले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान वाल्हे येथील पालखीतळावर भाविकांसाठी दर्शनबारी उभारणे, दिंड्या बाहेर जाण्याचा मार्ग, रांगेतील दर्शन व्यवस्था, पालखी रथ येण्याचे मुख्य ठिकाण, बैठक व्यवस्था, नीरास्नान दरम्यान जाणारा पर्यायी मार्ग, मोबाईल टॉयलेटसाठी पाणी, वीज पुरवठा आदींबाबत चर्चा करण्यात आली.
पर्यायी भुयारी मार्गाची मागणी
वाल्हेमध्ये पंधरा एकर क्षेत्रात शासनाच्या मालकीचा प्रशस्त पालखी तळ आहे. येथील पालखी तळ सुशोभित करणासाठी शासनाने भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामध्ये दोन स्वागत कमानी, संरक्षण भिंत, पालखी विसावा ओटा, हायमासट दिवे अशी कामे करण्यात आली.
वाल्हे येथील पालखी तळाकडे येणाऱ्या मार्गावर पुणे-मिरज लोहमार्ग असून मागील पाच वर्षांपासून भुयारीमार्ग काढून देण्यात आला आहे. मात्र हा भुयारीमार्ग अरूंद असल्याने व पालखी तळाकडे जाणाच्या एकमेव मार्ग असल्याने, भुयारीमार्गात वाहनांची तसेच वारकऱ्यांची मोठी गर्दी होते. त्यामुळे हा भुयारीमार्ग रूंद करावा किंवा पर्यायी भुयारीमार्ग त्वरित काढावा, अशी मागणी करण्यात आली.
पालखी मार्गाचे रुंदीकरण, दुरुस्ती गरजेची
पर्यायी पालखी महामार्ग असलेला पालखीतळ सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडवाडी, राख या रस्त्याचे रुंदीकरण करणे, साईडपट्टी भरणे, पालखी महामार्गावरील विद्युत खांब बसवावेत, पालखी मार्गावरून पालखी तळाकडे जाण्यासाठी इथे भुयारीमार्ग करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.
यावेळी वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड, वागदरवाडीचे सरपंच सुनील पवार, सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार, माजी सरपंच महादेव चव्हाण, उपसरपंच सागर भुजबळ, तेजस दुर्गाडे, साईनाथ चव्हाण, आनंद पवार, मारूती पवार, सागर पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.





