Ashadhi Wari 2025 : ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस!’ असा भाव मनात ठेवून, टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर आणि हरिनामाच्या जयघोषात पंढरीकडे निघालेला वारकऱ्यांचा भक्तीसागर शुक्रवारी (दि. २०) पुण्यनगरीत दाखल झाला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज या दोन्ही संतांच्या पालखी सोहळ्यांचे स्वागत करण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. अश्यातच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्यनगरीत आगमन झाले आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे बुधवारी (ता. १८) देहूतून आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे गुरुवारी (ता. १९) आळंदीतून प्रस्थान झाले. या दोन्ही संतांचे पालखी सोहळे शुक्रवारी सायंकाळी पुण्यात एकत्र येणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात असणार आहे. रविवारी (ता. २२) सकाळी या दोन्ही पालख्या पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील.