Ashadhi Wari 2023 : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता शासनातर्फे मिळणार ‘विठ्ठल-रुक्मिणी’ विमा कवच

मुंबई – पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांना राज्य सरकारने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. टोल माफी केल्यानंतर शासनातर्फे वारकऱ्यांसाठी विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. वारकऱ्यांना तीस दिवसांसाठी हे विमा संरक्षण दिले जाणार आहे. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे.
आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी येत असतात. यादरम्यान वारकऱ्यांच्या वाहनाला अपघात झाल्यास किंवा वारीमध्ये एखादे वाहन घुसून अपघात झाल्यास अशा घटनांमध्ये एखाद्या वारकऱ्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबांना पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
अपघातात कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास एक लाख रुपये आणि अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये, तसेच वारी दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयांपर्यंतची मदत देण्यात येणार आहे. वारीतील कुटुंबाना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे, असे एकनाथ शिंदे यांनी घोषणा करताना सांगितले.
दरम्यान, यंदा आषाढी एकादशी 29 जून 2023 रोजी आहे. या निमित्ताने पंढरपूर शहरामध्ये भरणारी आषाढी यात्रा 22 ते 6 जुलै या कालावधीत होणार आहे. पंढरपूर आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत आषाढी वारीसाठी राज्यासह अन्य राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपूरला येतात. या सर्व भाविकांची योग्य सोय व सेवासुविधा पुरविण्यासाठी विविध पातळीवर जिल्हा प्रशासन प्रयत्न करताना दिसत आहे.
अपघाती मृत्यू झाल्यास – 5 लाख रुपये
अपघातात अपंगत्व आल्यास – 1 लाख रुपये
अंशतः अपंगत्व आल्यास – 50 हजार रुपये
वारीदरम्यान आजारी पडल्यास – 35 हजार रुपये
दर्शनाचा वेळ होणार कमी
यंदा प्रथमच दर्शन रांगेत प्रत्येक 50 मीटरवर दर्शन रांग वेगाने पुढे नेण्यासाठी निरीक्षक नेमण्याची योजना जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी योजली आहे.
यामुळे आता यात्रा कालावधीत दर्शनाचा वेळ 7 ते 8 तासांनी कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरु केला आहे. यामुळे यात्रा कालावधीत 30 -30 तास दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
विठुरायाची दर्शन रांग विठ्ठल मंदिरापासून जवळपास 7 ते 8 किलोमीटर लांब जात असते. यातच दर्शन रांगेत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याने भाविकांच्या दर्शनाचा वेळ लांबतंच जात असतो.





