Maharashtra Election : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू

वसई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी आज संपूर्ण राज्यात मतदान पार पडत आहे. महायुती,महाविकास आघाडी आणि इतर पक्षांच्या एकूण 4136 उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. मात्र आजच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली आहे. निवडणूक कर्तव्यावर जात असताना एका आशासेविकेचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
निवडणूक कर्तव्यावर जात असलेल्या आशासेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. सुमन संतोष यादव असे मृत महिलेचे नाव असून त्या ३९ वर्षांच्या होत्या. सुमन यादव या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात मागील 5 वर्षांपासून आशासेविका म्हणून कार्यरत होत्या.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची ड्युटी आज नागले गावातील जिल्हा परिषद शाळा, खोली क्रमांक 1 येथे होती. आज सकाळी सुमारे 6.30 वाजता, त्या नागले गावातील रेल्वे रुळ ओलांडत असताना त्या धावत्या रेल्वेखाली आल्या आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.





