Asha Bhosle : एक सुवर्णयुग संपले! आशा भोसले काळाच्या पडद्याआड; पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक विश्वात शोककळा
Asha Bhosle : पिंपरी-चिंचवड आणि आशाताईंचे अतूट नाते; २००२ पासून सुरू असलेल्या 'आशा भोसले पुरस्कारा'च्या माध्यमातून शहर कायमचे जोडलेले.

Asha Bhosle – भारतीय संगीतसृष्टीतील अद्वितीय स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना आज शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात साश्रू निरोप देण्यात आला. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने देशभरातील संगीतप्रेमींसह पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक वर्तुळावरही गहिरी शोककळा पसरली आहे. पिंपरी-चिंचवड आणि आशाताई यांचे नाते केवळ संगीतापुरते मर्यादित नव्हते, तर ते एका दीर्घ सांस्कृतिक ऋणानुबंधाचे होते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेने २००२ पासून दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी आशाताईंच्या वाढदिवशी ‘आशा भोसले पुरस्कार’ देण्याची परंपरा सुरू केली. चित्रपट संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पार्श्वगायकांना एक लाख अकरा हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूपात दिले जाते. गेल्या दोन दशकांहून अधिक काळात लता मंगेशकर, खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लाहिरी, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, शंकर महादेवन, शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरिहरन, सोनू निगम यांसारख्या दिग्गज कलाकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
२०२४ मध्ये हा पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक शान यांना जाहीर करण्यात आला होता. याशिवाय २०१६ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमध्ये आशाताईंची ‘मराठी संगीत रजनी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम रसिकांच्या प्रचंड गर्दीत अत्यंत यशस्वी ठरला होता. या पुरस्काराच्या माध्यमातून आशाताईंचे नाव पिंपरी-चिंचवड शहराशी सांस्कृतिकदृष्ट्या कायमचे जोडले गेले आहे. त्यांच्या निधनाने शहराने एक अनमोल सांस्कृतिक हिरा गमावला आहे.
“आशाताई म्हणजे केवळ एक गायिका नव्हत्या त्या एक संगीतसाधनेच्या प्रतिक होत्या. लतादीदींचा श्वास आणि आशाताईंचा उच्छ्वास मिळून भारतीय संगीताने श्वास घेतला. गेल्या २२ वर्षांपासून त्यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करण्याचे भाग्य मला लाभले. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. त्यांनी मला माणुसकीची, नम्रतेची आणि उत्साहाची शिकवण दिली. एवढ्या उंचीवर पोहोचूनही त्या सौजन्यवत राहिल्या. आशाताई, तुम्ही देहाने गेलात, पण तुमचा स्वर अमर आहे!”
– भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद





