नवी दिल्ली :- पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी गुरूवारी सी. व्ही. आनंद बोस यांची नियुक्ती करण्यात आली. 71 वर्षीय बोस हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) निवृत्त अधिकारी आहेत.
मणिपूरचे राज्यपाल ला गणेशन यांच्याकडे बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्याआधी बंगालचे राज्यपाल असणाऱ्या जगदीप धनखड यांना देशाचे उपराष्ट्रपती बनण्याचा मान मिळाला.
राज्यपालपदी असताना धनखड आणि बंगालमधील तृणमूल कॉंग्रेस सरकारमध्ये विविध मुद्द्यांवरून सातत्याने संघर्ष झाला. आता बोस यांच्याकडे बंगालच्या राज्यपालपदाची सुत्रे गेली आहेत.
ते आयएएसच्या 1977 च्या तुकडीतील केरळ केडरचे अधिकारी आहेत. ते 2011 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्याआधी केरळमध्ये आणि केंद्रात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपाल म्हणून बोस यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले.