Indurikar Maharaj : ‘वय वाढलं की पुढारी….’; इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याची तुफान चर्चा, नेमकं काय म्हणाले?
Indurikar Maharaj : माढा तालुक्यातील अंजनगाव येथे झालेल्या एका कीर्तनादरम्यान त्यांनी राजकारण्यांच्या वाढत्या वयावर भाष्य करत खोचक टोला लगावला.

Indurikar Maharaj : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे आपल्या मिश्कील आणि परखड वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या कीर्तनातील अनेक वक्तव्यांवरून यापूर्वीही वाद निर्माण झाले आहेत. आता पुन्हा एकदा राजकीय नेत्यांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे इंदुरीकर महाराज चर्चेत आले आहेत.
माढा तालुक्यातील अंजनगाव येथे झालेल्या एका कीर्तनादरम्यान त्यांनी राजकारण्यांच्या वाढत्या वयावर भाष्य करत खोचक टोला लगावला. यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव घेतले नाही. मात्र, त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
इंदुरीकर महाराज म्हणाले की, “पुढाऱ्यांनी वयाच्या ६० वर्षांनंतर राजकारणातून थांबायला हवे. वय वाढत गेल्यानंतर बौद्धिक पातळी कमी होते आणि ते वेड्यासारखे वागू लागतात. जसजसे वय वाढते, तसतसे पुढारी वेडे व्हायला लागतात.”
याचबरोबर त्यांनी योग्य वेळी राजकारणातून बाजूला होण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. एका विशिष्ट वयात थांबण्यातही एक वेगळी मजा असते आणि त्यामुळे आपली इज्जत टिकून राहते, असे त्यांनी म्हटले.
सत्तेच्या हव्यासावरही इंदुरीकर महाराजांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केले. “सगळी माझीच पाहिजे” अशा मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी पदाला चिकटून राहण्याच्या प्रवृत्तीवर निशाणा साधला.
राज्याच्या सत्तेसाठी अवास्तव महत्त्वाकांक्षा न बाळगता योग्य वेळी पदत्याग करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी आपल्या वक्तव्यातून व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
Repo Rate Hike: कर्ज घेणाऱ्यांना मोठा धक्का! RBI ने रेपो दर वाढवला ; गृहकर्ज-वाहन कर्ज महागणार






