लाडकी बहीण योजनेसाठी आले चक्क सहा भावांचे अर्ज; सरकारची आधारकार्ड निलंबित करण्याची कडक कारवाई

अकोला – राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सुमारे दोन कोटीनपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेची नोंदणी अद्यापही सुरूच आहे. अकोल्यात लाडकी बहीण योजनेसाठी 6 भावांनी अर्ज केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या 6 जणांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रे जमा केल्याचे तपासात आढळले आहे. या सहा जणांवर महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.अकोल्यातील 6 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी नारी शक्ती दूत अॅपवर खोटी माहिती देत अर्ज भरला. अर्ज छानणीच्या वेळी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. आता त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
महिला आणि बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या या सहा जणांचे आधार कार्ड निलंबित करण्यात आले आहे. या सहा पुरुषांना आधारकार्ड द्वारे कोणताही लाभ मिळणार नाही. तसेच त्यांच्याकडून या प्रकाराबद्दल खुलासा मागवण्यात आला आहे, अशी माहिती अकोला जिल्हा माहिती आणि बालकल्याण अधिकारी गिरीश पुसदकर यांनी दिली आहे.
२९ सप्टेंबर रोजी तिसरा हप्ता
राज्य सरकारच्या वतीने 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना तिसऱ्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमातून सुमोर 2 कोटी महिलांना लाभ दिला जाणार आहे.
मागील दोन महिन्यांत काही अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या होत्या. त्यामुळे या तिसऱ्या हप्त्यात वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना थेट खात्यात पैसे जमा केले जातील, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.





