महापालिकेत आढळले तब्बल 88 लेटलतीफ

नगर -महापालिकेचे नूतन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी मंगळवारी मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. या हजेरी तपासणीत तब्बल 88 कर्मचारी कार्यालयात उशीरा येताना आढळून आले. या कर्मचाऱ्यांना पहिल्या दिवशी समज देण्यात आली. यापुढे असे कर्मचारी उशीरा येताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
महापालिका कार्यालयाची वेळ सकाळी 9.45 ते 6.15 अशी आहे. मात्र, बऱ्याचदा कर्मचारी अर्धा ते एक तास उशीरा येतात. करोना काळात बायोमेट्रीक हजेरी बंद होती ती अजूनही बंदच आहे. आता मात्र नवे आयुक्त डॉ. जावळे यांनी या प्रकाराची दखल घेतली आहे. कर्मचाऱ्यांना कामाचे नियोजन करून देणे, कर्मचाऱ्यांनी वेळेवर कामावर हजर होणे, कार्यालयीन कामे वेळेत करणे या महत्वाच्या गोष्टींवर भर लक्ष देण्यात येणार आहे. कामात हलगर्जीपणा केल्यास, वेळेवर हजर न राहिल्यास यापुढे थेट कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना कार्यालयात वेळेत हजर रहावे लागणार आहे.





