एकाच झाडाला तब्बल 300 प्रकारचे आंबे; लखनौ मधील अनोख्या झाडाची सगळीकडे रंगली चर्चा…

लखनौ – उत्तर प्रदेशची राजधानी असलेले लखनौ हे शहर नवाबांचे शहर म्हणून प्रसिद्ध असले तरी या शहरातील आंबेसुद्धा प्रसिद्ध आहेत. देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात येथील आंबे विक्रीसाठी उपलब्ध केले जातात. याच लखनौमध्ये एक अनोखे आंब्याचे झाड असून या एकाच आंब्याच्या झाडाला विविध 300 प्रकारचे आंबे लागतात असे दिसून आले आहे.
लखनौपासून काही अंतरावर असलेल्या मलीहाबाद नावाच्या गावामध्ये हे झाड आहे. लखनौतील हाजी कलीम खान यांनी हे अनोखे झाड विकसित केले आहे. आंब्याचे कलम करण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून हाजी कलीम यांनी हे झाड विकसित केले असून या झाडाला तब्बल 300 प्रकारचे आंबे लागतात.
कलीम यांनी केलेल्या या अनोख्या प्रयोगामुळे त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले आहे. आंब्याच्या झाडांवर त्यांच्याकडून करण्यात येणारे विविध प्रयोगांची दखल घेऊनच जगभरात त्यांची ओळख मॅंगो मॅन अशी झाली आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे 300 प्रकारचे विविध आंबे देणारे या झाडाची फळे कधीही विकली जात नाहीत, तर ती अनेकांना मोफत वितरित केली जातात. हाजी कलीम फक्त सातवी शिकले आहेत पण शेती क्षेत्रातील अनेक तज्ञ विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन घेत असतात.





