अग्रलेख : ट्रुडोंचे राजकारण…

भारत आणि कॅनडादरम्यान बिनसले आहे. भारताने कॅनडातील आपले राजदूत आणि अन्य राजनैतिक अधिकार्यांना माघारी बोलावले आहे. कॅनडाच्या भारतातील अधिकार्यांनाही मायदेशी परत जाण्यास सांगण्यात आले आहे. ज्या प्रकारे कॅनडाकडून बेफाम विधाने केली जात आहेत त्यातून हे स्पष्ट झाले आहे की, जोपर्यंत कॅनडाच्या पंतप्रधानपदावर जस्टीन ट्रुडो विराजमान आहेत तोपर्यंत संबंधांत सुधारणा होण्याची अथवा कटुता कमी होण्याची शक्यता कमी आहे.
भारताचे गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानसोबत ज्या प्रकारचे तणावाचे संबंध राहिले आहेत साधारण त्याचप्रकारचे संबंध कॅनडासोबत झाले असल्याचे गेल्या वर्ष-दीड वर्षांत समोर येते आहे. ट्रुडो यांच्या अगोदर स्टीफन हार्पर कॅनडाचे पंतप्रधान होते. त्यांच्या काळात भारत आणि कॅनडा परस्पर सहकार्य संबंध एका वेगळ्या उंचीवर गेले. हार्पर यांच्या अगोदरही दोन्ही देशांमध्ये सामंजस्य होते. जाहीर आरोपबाजी तीही पंतप्रधानांच्या स्तरावरून झाली नव्हती. आता जे काही ट्रुडो यांनी आरंभले आहे ती त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे. ते आपल्या सत्तेसाठी आणि नफ्या-तोट्यासाठी निव्वळ राजकारण करत आहेत एवढेच तूर्त सांगता येते आणि त्यामुळे भारताने त्याला धूप घालण्याची गरज नाही.
गेल्या वर्षी भारतात जी 20 च्या बैठकीसाठी जगातील प्रमुख देशांचे नेते आले होते. त्यावेळीच ट्रुडो तिरक्या चालीने चालत असल्याचे प्रथम निदर्शनास आले. भारतात जावई जसा रूसतो तसाच काहीसा प्रकार त्यांनी तेव्हा केला. नंतर त्यांनी भारतावर तोफच डागली. खलिस्तानवादाचा मुद्दा हा दोन्ही देशांतील तणावाचा केंद्रबिंदू ठरला आहे. वास्तविक खलिस्तानवाद हा ट्रुडो यांच्याच काळात कॅनडात जन्माला आला असे नाही. तथापि, त्यांच्या काळात त्याला पद्धतशीर खतपाणी घातले गेले आणि कोणती टोकाटोक झाली नाही. कॅनडातील पूर्वीच्या शासकांनी त्यावर बर्यापैकी नियंत्रण ठेवले होते. ट्रुडोंनी मात्र त्यांची राजकीय नाव किनार्याला नेण्यासाठी कॅनडातील खलिस्तान समर्थक न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचा पाठिंबा घेतला. ट्रुडो जे काही बोलत होते त्यामागे या पक्षाचे जगमित सिंग यांचा दृष्टिकोन असण्याचीच दाट शक्यता. आता जगमित यांच्या पक्षानेही ट्रुडोंना दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे.
ट्रुडोंची लोकप्रियता ओहोटीला लागली आहे. त्यामागे इतरही कारणे आहेत. त्यातील प्रमुख रोजगाराची समस्या आणि घरांच्या वाढत्या किमती आणि महागाई. कॅनडात बाहेरच्या देशांतून येणार्यांमुळे समतोल बिघडत चालला असल्याचीही तेथील जनतेची ओरड आहे. केवळ खलिस्तानवाद्यांनाच नाही तर अन्य धर्मांच्या कट्टरवाद्यांनाही ट्रुडोंच्या कार्यकाळात मुभा मिळाली आहे. त्यामुळे तेथील ख्रिश्चन, हिंदू आणि यहुदी या अन्य समुदायांतील लोकांवर आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. मध्यंतरी पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ आणि इस्रायलच्या निषेधार्थ एक हिंसक मोर्चाही तेथे निघाला. यातून एक समज आता कॅनडात प्रबळ झाला आहे की आपले अपयश झाकण्याकरता कदाचित ट्रुडो अशा आक्रमक गटांना मोकळे रान देत आहेत.
भारताविरुद्ध त्यांनी गरळ ओकण्याचे निमित्त शोधले ते भारताला हवा असलेला दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत. निज्जर भारतासाठी महत्त्वाचा होता. त्याची हत्या झाली अन् त्यामध्ये भारतीय अधिकार्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप ट्रुडोंनी केला. अगदी दोनच दिवसांपूर्वी म्हणजे सोमवारी रात्री त्यांनी भारतावर आणखी एक गंभीर आरोप केला. त्यात ते असे म्हणाले की, भारताच्या सांगण्यावरूनच सलमान खान प्रकरणी फेमस झालेला लॉरेन्स विश्नोई टोळी कॅनडातील शिखांना लक्ष्य करत आहे. योगायोग म्हणजे जगमित सिंग यांनीही असाच दावा केला आहे की, कॅनडातील शिखांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुळात कॅनडातच नव्हे तर भारताच्या अगदी ईशान्येकडच्या राज्यांत, हिमाचल प्रदेशात आणि थेट राजधानी दिल्लीतही खलिस्तानवाद्यांनी त्यांच्या घोषणांनी भिंती रंगवल्या आहेत.
भारताचे ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अगदी अमेरिकेतील दूतावासांनाही त्यांच्याकडून लक्ष्य केले गेले. कॅनडात भारतीय वंशाच्या नागरिकांना खुलेआम धमकावले गेले आणि मंदिरांचीही तोडफोड झाली. भारतीय अधिकार्यांनाही धमकावण्यापर्यंत मजल गेली. ट्रुडो मात्र त्यांचे स्वत:चे राजकारण चमकवण्यात व्यस्त आहेत. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा उत्सव साजरा करणारी मिरवणूक कॅनडात काढली गेली. हे सगळे होत असताना भारताने गप्प बसावे अशी ट्रुडोंची अपेक्षा आहे का? तसेच बिश्नोई टोळीचे नाव घेऊन किंवा निज्जर हा कॅनडाचा नागरिक असल्याचे सांगत गळा काढून ट्रुडो यांनी जो प्रकार चालवला आहे त्याला ‘चोराच्या उलट्या बोंबा’च म्हटले जाते. जग साक्ष आहे की मूलतत्त्ववादी मग ते कोणत्याही धर्माचे असो वा वंशाचे त्यांना शांततेचे भय वाटत असते. या भयातून ते आपला अतार्किक हिंसाचार सुरू ठेवत असतात. त्यामागची विचारधारा किती प्रामाणिक आहे याचा कथित आव ते आणत असले, तरी ज्या देशांत त्यांना आपली विनाशकारी विचारधारा मांडण्याचे आणि जोपासण्याचे स्वातंत्र्य दिले जाते त्या देशांच्या मुळावरही शेवटी ते उठतात.
पाकिस्तान हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण. विशिष्ट गटाला मुभा देऊन भारताविरुद्ध आपली जीभ सैल सोडताना ट्रुडो यांना याचेही भान असायला हवे की, ही आग त्यांचे स्वत:चे घरही पेटवू शकते. इस्रायलच्या हल्ल्यांच्या निषेधार्थ कॅनडात निघालेले आक्रमक मोर्चे असोत किंवा दिवंगत इंदिराजींच्या हत्येचा जल्लोष करणारी मिरवणूक असो, यामागची मानसिकता सारखीच आहे. ती ट्रुडो यांचाच अखेर घात करेल. भारताला बोल लावून आपल्याच देशातील शांततेचा त्यांनी नाश करू नये.





