Aryna Sabalenka Slams : “हा कसला मूर्खपणाचा सवाल आहे? तुम्ही लोक थट्टा…”, पार्टीवरून विचारलेल्या प्रश्नावर भडकली आर्यना सबालेन्का
Aryna Sabalenka Slams : टेनिसपटू आर्यना सबालेन्का सामन्यानंतर पत्रकार परिषदेत भयंकर संतापलेली पाहायला मिळाली.

US Open 2026 Aryna Sabalenka Slams Reporter Over Party Comment Wins 15th Consecutive Match : अमेरिकन ओपन २०२६ (US Open 2026) स्पर्धेत दोन वेळची गतविजेती आणि जगातील अव्वल महिला टेनिसपटू आर्यना सबालेन्का (Aryna Sabalenka) हिने कोर्टवर आपल्या आक्रमक खेळाचा जलवा दाखवला, मात्र सामन्यानंतर पत्रकार परिषदेत तिचा भयंकर संताप पाहायला मिळाला. स्पर्धेपूर्वी ब्रँड प्रमोशन्सचे काम करत असताना एका पत्रकाराने तिला ‘पार्ट्या आणि मजा-मस्ती’वरून डिवचल्याने सबालेन्काचा पारा चढला आणि तिने त्या पत्रकाराची सर्वांसमोर जोरदार शाळा घेतली.
“पार्टी अन् मस्ती? हे काय चाललंय?”; पत्रकाराला सुनावले खडे बोल!
दुसऱ्या फेरीत पोलिना यात्सेन्कोचा ६-१, ६-१ असा फडशा पाडल्यानंतर पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने सबालेन्काला विचारले, “गेल्या आठवड्यात भरपूर पार्ट्या आणि मजा-मस्ती केल्यानंतर आता स्पर्धेत तुमचा मूड कसा आहे?” यावर भडकलेली सबालेन्का म्हणाली, “हा कसला मूर्खपणाचा सवाल आहे? तुम्ही लोक थट्टा बनून राहिला आहात. मी ब्रँड्ससाठी काही प्रमोशनल काम केले तर तुम्हाला ती पार्टी वाटते का? असा विचार करण्याचे धाडस तरी तुम्ही कसे करू शकता?”
अवघ्या ५३ मिनिटांत विजय; यूएस ओपनमध्ये सलग १५ व्या विजयाचा विक्रम –
Aryna Sabalenka WASN’T HAPPY with a question about her not taking tennis seriously 😳
‘Why would you even say that? Why would you even think that?’ 😡
↳ US Open. Every Match. Live & On Demand.#StanSportAU #USOpen pic.twitter.com/1Gzbkmb8GN
— Stan Sport (@StanSportAU) September 3, 2026
पत्रकार परिषदेतील या गोंधळाव्यतिरिक्त कोर्टवर मात्र सबालेन्काचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळाले. अव्वल मानांकित सबालेन्काने एकतर्फी लढतीत पोलिना यात्सेन्कोला अवघ्या ५३ मिनिटांत ६-१, ६-१ ने धूळ चारत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. न्यूयॉर्कच्या फ्लशिंग मीडोज मैदानावर सबालेंकाचा हा सलग १५ वा विजय ठरला असून तिने आपला दबदबा कायम राखला आहे.
कामिला राखिमोव्हाविरुद्ध पुढची लढत; सलग तिसऱ्या जेतेपदावर नजर –
शानदार विजयानंतर सबालेन्का म्हणाली की, ती कोर्टवर परिपूर्ण बनण्यापेक्षा आपल्या सातत्यावर भर देत आहे. तिसऱ्या फेरीत तिचा सामना उझबेकिस्तानच्या कामिला राखिमोव्हाविरुद्ध रंगणार आहे. येथे विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा अमेरिकन ओपनचा ग्रँडस्लॅम चषक उंचावून नवा इतिहास रचण्याचा सबालेन्काचा निर्धार आहे.





