दिल्ली प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अरविंदर सिंग लवली नियुक्ती

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसने दिल्लीत मोठा बदल केला असून, अरविंदर सिंग लवली यांना दिल्ली कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अरविंदर सिंग लवली यांची दिल्ली प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सध्या अनिल चौधरी यांच्याकडे ही जबाबदारी होती.
कॉंग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी एक पत्र जारी करून म्हटले आहे की, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अरविंदर सिंग लवली यांची दिल्ली कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून तत्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे.
शीला दीक्षित सरकारमध्ये 1998 ते 2013 या काळात लवली तीन वेळा आमदार होते. त्यांनी शिक्षण मंत्रिपदही भूषवले आहे आहे. शिक्षणमंत्री म्हणून अरविंदर यांनी सार्वजनिक शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी 20 टक्के आरक्षण लागू करण्यासाठी पुढाकार घेतला. यासोबतच शाळांमध्ये संगणकाचे शिक्षण देणारे दिल्ली हे देशातील पहिले राज्य बनवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
पर्यटन मंत्री या नात्याने त्यांनी दिल्लीला कुतुब महोत्सव, भक्ती महोत्सव, अनन्या महोत्सव, शरद उत्सव, उद्यान पर्यटन महोत्सव आणि आंबा महोत्सव यांसारखे पर्यटन केंद्र बनवण्यासाठी अनेक उपक्रम घेतले. 2017 मध्ये दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत अरविंदर सिंग लवली यांनी कॉंग्रेस पक्ष सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, वर्षभरानंतर ते कॉंग्रेसमध्ये परतले.





