Arvind Sawant : निवडणूक आयोगाकडून भाजपची पाठराखण; खा. अरविंद सावंत यांची टीका

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने दिलेल्या उत्तरावर विरोधी पक्षांचे समाधान झालेले नाही. आम्ही पक्ष -विपक्ष करत नाही, या आयोगाच्या दाव्यावरच ठाकरेसेच्या नेत्यांनी बोट ठेवले आहे. बोगस मतदानाचे कागदोपत्री पुरावेच नाही तर व्हिडिओ क्लिपिंग आयोगाला दिले, मात्र ते कोणाच्या इशाऱ्यावर बोलत आहेत, आणि भाजपची पाठराखण करत असल्याचा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी केला.
नवी दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अरविंद सावंत म्हणाले, निवडणूक आयोगामुळे सर्वाधिक नुकसान कोणाचे झाले असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे झाले आहे. निवडणूक आयोगाची कालची पत्रकार परिषद ही भाजपचा प्रवक्ता म्हणून बोलत आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी सर्वाधिक यशस्वी राहिली आमचे सर्वाधिक खासदार निवडून आले. त्यानंतर पाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत 46 लाख अधिक मतदार मतदान करतात.
सायंकाळी पाच नंतर 76 लाख मतदार मतदान करतात, तर त्याचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही निवडणूक आयोगाला मागितले होते. त्यावर काल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, ते आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे माता, भगिनींच्या गोपनियतेचा, प्रायव्हसीचा प्रश्न निर्माण होतो. माता, भगिनी मतदान करण्यासाठी आल्या आहेत, त्याचे व्हिडिओ फुटेज दिल्याने त्यांच्या गोपनियतेचा कोणता भंग होतो, असा सवाल करत अरविंद सावंत म्हणाले की, निवडणूक आयोग भाजपची कशा प्रकारे पाठराखण करत आहे हे त्यांच्या उत्तरावरुन स्पष्ट झाले आहे.
फक्त काही आमदार निवडणूक आयोगाकडे गेले म्हणून आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह फुटीर गटाला देऊन टाकले. जेव्हा आम्ही जाब विचारला तर आम्हाला संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची नावे देण्यास सांगण्यात आली. नावे दिली, सदस्य नोंदणी फॉर्म दिले तर त्यांचे प्रतिज्ञापत्र मागितले गेले. समोरच्या पक्षाने तर काहीच दिले नाही तरी त्यांना आमचे नाव आणि निवडणूक चिन्ह देऊन टाकले, तरीही निवडणूक आयोग म्हणतो की आम्ही पक्ष आणि विपक्ष पाहात नाही. कोणाच्या इशाऱ्यावर हे केले, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला.





