Arvind Kejriwal : ई -20 इंधनामुळे वाहनांचे मायलेज घटले; अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर निशाणा
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी शनिवारी दिल्लीतील एका पेट्रोल पंपाचा आणि सर्व्हिस स्टेशनचा दौरा करून वाहनधारकांशी संवाद साधला.

Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी शनिवारी दिल्लीतील एका पेट्रोल पंपाचा आणि सर्व्हिस स्टेशनचा दौरा करून वाहनधारकांशी संवाद साधला. केंद्र सरकारच्या २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल म्हणजेच ई २० इंधनामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पेट्रोल पंपावर आलेल्या ग्राहकांशी आणि तिथल्या कर्मचाऱ्यांशी थेट चर्चा केली, वाहनांच्या इंजिनची पाहणी केली आणि त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. केंद्र सरकारचे ई २० इंधनाबाबतचे सर्व दावे म्हणजे साफ खोटे आहेत. जमिनीवरील वास्तव यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. पेट्रोल पंपावर आलेल्या बहुतांश वाहनधारकांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे त्यांच्या गाड्यांचे मायलेज लक्षणीयरीत्या कमी झाल्याची तक्रार केली आहे.
अनेक ग्राहकांनी वाहनांचे इंजिन खराब होणे किंवा इतर तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. लोकांच्या तक्रारी फेटाळून लावण्याऐवजी सरकारने वाहनधारकांना भेडसावणाऱ्या या समस्यांची गंभीरतेने दखल घेतली पाहिजे, असे केजरीवाल म्हणाले.
दरम्यान, गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने सोशल मीडियावर ई २० इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाबाबत पसरत असलेल्या अफवांचे सविस्तर खंडन केले होते. या इंधनामुळे इंजिनचे नुकसान होते, वाहनाचा विमा रद्द होतो किंवा पर्यावरणाला हानी पोहोचते, हे सर्व दावे सरकारने (Arvind Kejriwal) तथ्यहीन म्हणून फेटाळून लावले होते.






