Arvind Kejriwal : खळबळजनक ! केजरीवाल यांच्या मुलीला बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या कुटुंबाशी संबंधित एक अत्यंत खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे.

Arvind Kejriwal : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या कुटुंबाशी संबंधित एक अत्यंत खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. केजरीवाल यांची कन्या हर्षिता केजरीवाल हिला जीवे मारण्याची धमकी देत तब्बल ७ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने ही धमकी देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता यामागील धक्कादायक सत्य उघड झालं असून ही धमकी पूर्णपणे खोटी असल्याचं निष्पन्न झालं आहे.
या प्रकरणी आम आदमी पार्टीचे (Arvind Kejriwal) आमदार जरनैल सिंग यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, ६ नोव्हेंबर रोजी त्यांना एक अज्ञात फोन कॉल आणि व्हॉट्सअॅप मेसेज आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचं सांगत, “अरविंद केजरीवाल यांना ७ कोटी रुपये द्यायला सांगा, अन्यथा त्यांची मुलगी हर्षिताची हत्या केली जाईल,” अशी थेट धमकी दिली होती. या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या.
जरनैल सिंग यांनी मोहालीच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे (SSP) याबाबत रीतसर तक्रार नोंदवल्यानंतर, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि आयटी अॅक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संबंधित मोबाईल नंबर, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), आयपी लॉग आणि लोकेशनचा तांत्रिक तपास केला.
या तपासात असं समोर आलं की, हा कॉल लॉरेन्स बिश्नोई गँगने केला नसून हरियाणातील रोहतक येथून एका व्यक्तीने खोडसाळपणाने केला होता. पोलीस सध्या या फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
आरोपीने हा खोटा कॉल नेमका कोणत्या हेतूने केला आणि त्याचा संबंध एखाद्या राजकीय पक्षाशी आहे का? या दिशेने पोलीस आता चौकशी करत आहेत. दुसरीकडे, आम आदमी पार्टीने या प्रकरणावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे.
पंजाबमध्ये आमचं सरकार असल्याने पक्षाला, सरकारला आणि पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यासाठीच अशा प्रकारचे बनावट कॉल करून बदनामीचा डाव रचला जात असल्याचा गंभीर आरोप ‘आप’कडून करण्यात आला आहे.
कोण आहे हर्षिता जैन?
हर्षिता ही अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि सुनिता केजरीवाल यांची एकुलती एक मुलगी आहे. अत्यंत हुशार असलेल्या हर्षिताने २०१४ मध्ये कठीण मानली जाणारी IIT-JEE परीक्षा उत्तीर्ण करून IIT दिल्लीमध्ये प्रवेश मिळवला होता. २०१८ मध्ये तिने केमिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने गुरुग्राम येथील नामांकित ‘बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप’ (BCG) मध्ये असोसिएट कन्सल्टंट म्हणून काही काळ काम केलं. एप्रिल २०२५ मध्ये तिचा विवाह संभव जैन यांच्याशी झाला असून, पतीसोबत मिळून तिने ‘बेसिल हेल्थ’ नावाचं स्टार्टअप सुरू केलं आहे, जे हेल्दी फूड आणि कस्टमाइज्ड मीलच्या क्षेत्रात कार्यरत आहे.






