पिंपरी | मराठवाडा भवनसाठी अरुण पवार यांनी दिली १० गुंठे जागा

सांगवी, (वार्ताहर) – गेल्या १२ वर्षांत शासन दरबारी खूप प्रयत्न करूनही शहरात मराठवाडा भवनसाठी जागा मिळू शकली नाही. मात्र, पिंपरी – चिंचवड शहरात मराठवाडा भवन करायचेच, हा निर्धार मनात ठेवून मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांनी स्वतःची पिंपळे गुरव येथील १० गुंठे जागा मराठवाडा भवन बांधण्यासाठी दान केली.
आज पिंपळे गुरवसारख्या ठिकाणी तब्बल ४० लाख रुपये प्रति गुंठा जागा असतानाही आपल्या फायद्याचा विचार न करता १० गुंठे जागा दान केल्याने शहरातील मराठवाडा वासियांनी अरुण पवार यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात वृक्षमित्र अरुण पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात अरुण पवार यांनी मराठवाडा भवनसाठी जागा देत असल्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजचे कार्याध्यक्ष डॉ. भाऊसाहेब जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस उपस्थित होते.
यावेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा अॅड. भारती चव्हाण, ज्येष्ठ प्रबोधनकार शारदा मुंढे, ह. भ. प. बब्रुवान वाघ महाराज, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, धारूरचे सरपंच बालाजी पवार, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर,
अभिमन्यू पवार, प्रवीण कदम, जनकल्याण प्रतिष्ठान बाळासाहेब काकडे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, तुषार कामठे, राहुल कलाटे, चंद्रकांत नखाते, श्याम जगताप, तानाजी जवळकर, प्रशांत शितोळे,
अतुल शितोळे, शिवाजी पाडुळे, बैलगाडा मालक सखाराम काशीद आदी उपस्थित होते. तसेच खूप मोठ्या संख्येने नागरिक उपस्िथत होते. प्रास्ताविक दत्तात्रय धोंडगे यांनी, तर सूत्रसंचालन व आभार कोकाटे यांनी मानले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. लोकशाहीर राजेंद्र कांबळे खडुस्कर यांचा महाराष्ट्राचा मर्दानी बाणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
१७५ जणांनी केले रक्तदान
वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ह भ प गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाट्न करण्यात आले.
शिबिरात पावणेदोनशे रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्यात आले. तसेच वृक्षदान सप्ताहा अंतर्गत १० ऑगस्टपासून ११ हजार वृक्ष रोपांचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.
अवघ्या दहा मिनिटांत २५ लाखांची देणगी
अरुण पवार यांनी ‘मराठवाडा भवन’साठी पिंपळे गुरव या ठिकाणी 10 गुंठे (दहा हजार स्क्वेअर फुट) जागा देण्याचे जाहीर करताच मराठवाडा भवनच्या बांधकामासाठी अवघ्या दहा मिनिटांत तब्बल २५ लाख रुपयांची देणगी कार्यकर्त्यांनी घोषित केली.
अरुण पवार राजकारणातही विधायकच काम करणार – श्रीपाल सबनीस
प्रत्येकाला ‘माऊली’ नावाने बोलणारे अरुण पवार यांनी वृक्षसंगोपन व संवर्धनात तर नाव कमावलेच आहे. शासनाने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांच्या कामाची पोचपावती दिलीच आहे.
सेंट्रिंग कामगार म्हणून कामगारनगरीत आलेल्या अरुण पवार यांनी उद्योग, व्यवसाय, अध्यात्म, समाजकारण, राजकारणात घेतलेली झेप प्रेरणादायी आहे.
कोणत्याही राजकीय पक्षात जावो, ते विधायकच काम करणार याचा विश्वास आहे. कारण त्यांच्या पाठीशी फक्त लोकच नाहीत, तर वृक्षांचा आशीर्वाद आहे.
आज एक फूट जागा सोडायला कुणी तयार नाही. अशा काळात मराठवाडा बांधवांसाठी १० गुंठे जागा देणे, हा मनाचा मोठेपणा आहे. वारकऱ्यांचे संस्कार असलेली व्यक्ती विधानसभेत गेली तर स्वागतच आहे.





