अरुण जेटली हे बहुआयामी, अभ्यासू व्यक्तीमत्त्व

पुणे – अरुण जेटली यांच्या निधनाने भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जेटली यांचे वक्तीमत्त्व बहुआयामी, अभ्यासू होते. त्यांच्या जाण्याने उत्तम मार्गदर्शक हरपला, अशी भावना पुण्यातील नेत्यांनी वक्त करत जेटली यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अरुण जेटली यांचे वाचन अफाट होते. आणीबाणीत तुरुंगात असताना त्यांनी खूप पुस्तके वाचल्याची आठवण सांगितली होती. याच कालावधीत त्यांनी लोकमान्य टिळकांचा गीतारहस्य ग्रंथही वाचला होता. हा ग्रंथ उत्तम असून त्यांच्या अर्थविषयक तत्त्वांची अंमलबजावणी केल्यास देशाची अर्थव्यवस्था सुधारू शकते, असे जेटलींनी एका भेटीत सांगितले होते.
– मुक्ता टिळक, महापौर, पुणे.
अरुण जेटली भाजपचे “थिंक टॅंक’ होते. त्यांचा कार्यकर्त्यांशी उत्तम संपर्क होता. सखोल चर्चा करून ते कार्यकर्त्यांना विषय समजून सांगायचे. त्यांच्या निधनाने आमचा उत्तम मार्गदर्शक हरपला आहे.
– माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजप.
अरुण जेटलींशी गेले 30-35 वर्षे संपर्क होता. त्यांचा विद्यार्थी दशेपासूनच विद्यापीठ, महाविद्यालय निवडणुका लढवणे, जिंकणे यात हातखंडा होता. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी 19 महिने तुरुंगवासही भोगला आहे. दिल्लीमध्ये त्यांच्याकडे बहुआयामी व्यक्तीमत्त्व म्हणून पाहिले जात होते. कायदा, व्यापार, अर्थ, संरक्षण या खात्यांचे मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. अटल बिहारी वाजपेयींच्या काळातही ते मंत्री होते. त्यांच्याबाबत बोलताना खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते, की जेटलींचे भाषण ऐकत रहावे असे असते. त्यांचे मुद्दे अभ्यासपूर्ण आणि विविधांगी असतात. प्रत्येक ठिकाणी जागेवर जाऊन पाहणी करणे, ज्ञान मिळवणे यात त्यांचा हातखंडा होता. पक्षाची धोरणे ठरवताना जे मोजके प्रमुख होते त्यात जेटली यांचा समावेश होता. पक्षाची बाजू देशातच नव्हे, तर परदेशातही ठामपणे मांडण्याची त्यांची हातोटी होती. सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरलो नव्हतो, तोपर्यंत हा दुसरा आघात सर्वांच्या मनावर झाला आहे.
– गिरीश बापट, खासदार, पुणे





