पुणे | कलावंतांनी बहुश्रुतता अंगी बाळगावी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नाट्यक्षेत्रात येणाऱ्या कलावंत मुलांनी शरीरयष्टी सुदृढ ठेवावी. ओंकारसाधना करण्याबरोबरच बहुश्रुतता अंगी बाळगावी, असा सल्ला ज्येष्ठ एकपात्री कलाकार प्रभाकर निलेगावकर यांनी दिला.
नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या ३३ व्या दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेची अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
पारितोषिक वितरण निलेगावकर यांच्या हस्ते झाले. अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, विश्वस्त संध्या कुलकर्णी, अभिनेता नचिकेत देशपांडे उपस्थित होते.
नाट्यछटा हे एकपात्रीचेच मूळ रूप आहे. नाट्यक्षेत्रात मुलांकडून काम करून घेताना पालकांचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. नाट्यछटा हे कमी वेळात उत्कृष्ट सादरीकण करण्याचे एक माध्यम असल्याचे निलेगावकर म्हणाले. प्रकाश पारखी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन आरती दाते यांनी केले, तर आभार सायली पाटील यांनी मानले.




