Anna Hazare : अण्णा हजारेंचे 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशावर भाष्य; पक्षांतरे का केली जातात? सांगितलं कारण…
Anna Hazare: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची पक्षांतराच्या राजकारणावर नाराजी

Anna Hazare : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बंडखोरी केलेल्या सहा खासदारांनी सोमवारी अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांनी यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेत सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या राजकीय घडामोडीनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पक्षांतराच्या राजकारणावर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 6 खासदार फुटल्याबाबत प्रश्न विचारला असता अण्णा हजारे यांनी म्हटले की, “अशा पद्धतीने पक्ष बदल करणे योग्य नाही. श्रद्धा, निष्ठा आणि ध्येयवाद नसल्यामुळेच दलबदल होतो. समाजासाठी काम करण्याची भूमिका असलेले नेते सहजपणे पक्ष बदलत नाहीत. अनेकदा स्वतःचे हित साधण्यासाठीच पक्षांतर केले जाते,” असा आरोप अण्णा हजारे यांनी केला.
एकनाथ शिंदेंकडून खासदारांना ग्वाही
नव्या खासदारांचे स्वागत करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेच्या परिवारात सहा नवीन खासदार सामील झाले आहेत. त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल. त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष होणार नाही. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
केंद्र सरकारशी संबंधित प्रश्न असोत किंवा राज्यातील विकासकामे, या खासदारांच्या मतदारसंघातील कोणतेही काम अडवले जाणार नाही, तुमच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण सहकार्य करेन. आपण कुटुंब म्हणून पुढची वाटचाल करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली. Anna Hazare
‘शिवसेना आणखी भक्कम होणार’
या प्रवेशामुळे पक्षाची ताकद आणखी वाढणार असल्याचा दावा करत शिंदे म्हणाले, ही सगळी ताकद एकत्र आल्यानंतर शिवसेना अधिक भक्कम होईल. आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. भाषणादरम्यान एकनाथ शिंदे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व खासदारांचे वैयक्तिकरित्या कौतुक केले.
संजय दिना पाटील हे जनतेशी जोडलेले आणि कार्यकर्त्यांचा कैवारी असल्याचे त्यांनी सांगितले. ओमराजे निंबाळकर यांचा उल्लेख करताना, त्यांना काही जणांनी ‘रील स्टार’ म्हटलं, पण ते ‘रिअल स्टार’ आहेत, असे शिंदे म्हणाले. संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कामाचाही त्यांनी गौरव केला.
‘हा दुसरा टप्पा, चौकार नाही तर षटकार’
२२ जून २०२२ च्या बंडाचा संदर्भ देताना त्यांनी पुढे म्हटले, “शिवसेना, धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला होता. त्यावेळी ४० आमदार सोबत आले. आता या लढ्याचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.
चौकार नाही तर यावेळी षटकार मारला आहे. शिवसेनेचा विचार जिथे आहे, तिथे शिवसैनिक आहेत. त्यामुळे या सहा खासदारांनी खऱ्या शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. काही लोक चुकीच्या बातम्या आणि आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र मी सर्वांचा मान-सन्मान राखेन,” असेही शिंदे म्हणाले.
हेही वाचा:






