पिंपरी – बेकायदेशीरपणे पिस्तूल आणि गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 3 किलो 20 ग्रॅम गांजा आणि एक पिस्तूल असा एकूण एक लाख 20 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
विशाल गोरख कदम (वय 27), रोहन महादेव लिंगे (वय 20, दोघे रा. दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम. बी. गाढवे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी भोसरी पोलिसांना माहिती मिळाली की, दापोडी येथील एसटी वर्कशॉप जवळ दोन तरुण संशयितरित्या थांबले आहेत. त्यांच्याजवळ गांजा आणि पिस्तूल आहे.
त्यानुसार भोसरी पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपी विशाल आणि रोहन या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये तीन किलो 20 ग्रॅम वजनाचा गांजा आणि आरोपी विशाल याच्या कमरेला पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले. दोघांना अटक करण्यात आली असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.