सणबूर -पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सन 2019 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत नियमितचे 5 व संशोधन विकास कार्यक्रमातंर्गत 5 अशी एकूण 10 रस्त्यांची कामे मंजूर करुन आणली आहेत. या कामांना आवश्यक असणारा निधीही शासनाने दिला आहे. मात्र, या कामांना विलंब लागला आहे. या दहा कामांना तात्काळ गती देवून ही कामे लवकरात लवकर मार्गी लावा, अशा सक्त सूचना ना. शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता एस. पी. खलाटे, उपअभियंता व्ही. बी. पानस्कर, शाखा अभियंता एस. एन. म्हासेरे, व्ही. बी. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकी दरम्यान प्रलंबित कामे लवकरच सुरु करण्याचे नियोजन विभागाने केले असल्याची माहिती अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली. या प्रलंबित कामांमध्ये नाडोली गावपोहोच, दिवशी ते मारुलहवेली, मणदुरे फाटा ते निवकणे, वर्पेवाडी गोकुळ गावपोहोच रस्ता तसेच संशोधन विकास कार्यक्रमातंर्गत नुने गावपोहोच, पाळेकरवाडी गावपोहोच, खिवशी गावपोहोच, तोरणे गावपोहोच व भारसाखळे जौरातवाडी या एकूण 10 रस्त्यांच्या कामांचा समावेश असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
ना. देसाई म्हणाले, पाटण तालुक्यातील महत्त्वाच्या गावांमध्ये या गावांचा समावेश होतो. या गावांमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. ही प्रमुख गावे असून या गावांना जोडणारे रस्ते तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता विलंब न करता तात्काळ या कामांना गती देवून ही कामे लवकरात-लवकर कशी पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांनीही सदरची कामे तात्काळ पूर्ण करणार असल्याची ग्वाही बैठकीदरम्यान दिली.