आमदार निवासात चुलीची सोय करा; कॉंग्रेस आमदाराची योगी सरकारकडे मागणी

लखनौ – गॅस सिलींडरच्या किंमती दिवसेदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून गॅस पेक्षा आता चुलीवर स्वयंपाक करणे अधिक स्वस्त झाले आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला आमदार निवासाच्या ठिकाणी गॅस सिलिंडरच्या ऐवजी चुलींची सोय करावी अशी मागणी उत्तरप्रदेशातील कॉंग्रेस आमदार दीपक सिंह यांनी केली आहे.
त्यांनी तशा मागणीचे अधिकृत पत्र आमदार निवासाच्या व्यवस्थापकांना पाठवले आहे. केवळ माझ्याच नव्हे तर येथील सर्व तिन्ही ब्लॉक मधील आमदारांसाठी ही सोय केली तर बरे होईल असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की गॅस सिलिंडर 975 रूपयांना झाला आहे. मला महिन्यातून दोनदा सिलिंडर भरावा लागतो.
त्यापेक्षा चुलीवर स्वयंपाक करण्याचा महिन्याचा खर्च केवळ 500 रूपये इतका येतो. माझ्यासह अन्यही अनेक आमदारांचीही चुल बसवून देण्याची मागणी आहे असेही त्यांनी म्हटले आहे. सध्या सरकारने गॅस वरील अनुदान बंदच केले आहे. त्यामुळे यापुर्वी 412 बारा रूपयांना मिळणारा गॅस सिलिंडर 975 रूपयांना घ्यावा लागत आहे. त्याची झळ आता आमदारांनाही बसू लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे.





