रूपगंध : निळे वेदनेचे पाखरू

– डॉ. सुनीता बागवडे
अवचित आले. मनात रुजले ते निळे वेदनेचे पाखरू. निळ्या झळाळी पंखांच्या भरारीचे, उष्ण उच्छ्वासाचे खोल डोह डोळ्यांचे ते पाखरू. का आहे इतके सुंदर इतके उत्कट, इतके आर्त? ते त्याच्या मंजुळ शिळेत जणू विराणी गाते. कुणा काळचे खूप खोल दबलेले वाहत येते. रक्तासारखे की त्याहून जास्त घट्ट, अश्रूंसारखे की त्याहून अधिक शुद्ध. तप्त सुवर्णासारखे प्रवाही पण घाट घेऊ पाहणारे. चंद्र चांदीने प्रकाशित पण तरी धगधगीत. काय आहे ते. आणेल का त्याच्या सवे खूप नकोसे तरी अत्यंत जवळचे. त्याच्या निळ्या कांतीत खोल काही रक्तरंजीत वाहताना दिसते. आता बाहेर येईल की मग उसळी घेईल असे ते वेदनेच्या धमणीतील दाबून भरलेले लाल भडक प्राणांतिक दुःख.
नको वाटते त्याचे मंद दुःखाचे गाणे. ऐकू येऊच नये. बाहेरच्या गलक्यात वाहून जावे. बहिरे व्हावे. हातातील प्रकाश बाहुल्यांमध्ये भरकटताना दिसूच नये उदास गुहेतील त्याची तडफड. नको ते अवघडले रुदनक्षण डोळ्यांच्या कोरड्याठक्क पडलेल्या विहिरीत पाणी भरणारे. नको आहे प्रवेश त्या नेणिवेच्या कातळ पाताळात. किती किती घडलेले, गाडलेले त्याच्या फडफडीने वर येईल. सुटलेले हात, हरवलेले चेहरे, सांगितलेल्या कहाण्या, नाळेच्या आतड्याचे गाळीव तीव्र हुंकार. नको आहेत ऐकायला आता इतक्या आतले मुश्किलीने घट्ट बंद केलेले काही.
खरे तर तो पक्षी तिथेच होता. लख्खकन दिसला काही वाचताना, तितक्याच वेदनेच्या परदेशी पक्ष्याचे दुसरे दबलेले गाणे ऐकताना. सगळ्यात असताना पूर्णपणे एकटा असा तो. खरे तर त्याला बाहेर पडायचे आहे. पण मी घट्ट झाकून ठेवले आहे निर्दयपणे. त्याच्यावर की स्वतःवरच दिलाय मी तो क्रूर दाब जीव घुसमटवणारा. कारण दिसायला नको ना कुणाला. बाहेर हसताना, खिदळताना कळायलाच नको की तिथे तो आहे. चुकून हसता बोलता डोळ्यांच्या खिडकीत बसला तो तर? कल्पनेनेच कापरे भरते. कारण तो दिसताच कदाचित छिन्न करणारे दगड वर्षतील कुत्सित, छद्मी, शब्दांचे, क्रूर आनंदी हसण्याचे. आजूबाजूच्या चेहर्यांमागील दुष्ट विद्रूप अस्तित्व दिसायलाच नको त्याला, कुणालाच. म्हणून कळू द्यायचे नाहिये कुणाला तो आहे आत. त्याच्या निळ्या अलवार अस्तित्वावर काळे ढग बरसायला नकोत. विरघळून जाईल ना तो.
कदाचित मी पुरुष नसण्याचा दुष्परिणाम असाही. ना त्याच्यावर व्हिस्की ओतली जाईल ना सिगारेटच्या धुराच्या धुक्यात तो दडून जाईल. कधी तरी सोडून यावे वाटते दूरच्या अज्ञानात, दिगंतापार त्याला. काही काळ आनंद सुखाचा आभास तरी मिळेल. पण पण येईलच ना परत तो टळटळीत दुपारी, काळ्या कुंद रात्री गुदमरवून टाकणारा भावनांचा पूर घेऊन. कारण कुणालाच नको आहे माझ्या वेदनेचे ते पाखरू. मग असू दे म्हणते राहू दे माझ्या आतच त्याचे संवेदन माझ्या एकटेपणाचे सोबती. मुकाटच तर असते बर्याचदा बिचारे कुठेतरी खोल हलणार्या तारेवर बसलेले.
खरेतर कुठल्या सामान्य सहज मिळणार्या किरकोळ आनंदी लोकांना त्याचे तिथे असणे जाणवतच नाही. पण तो निळा भावविभोर मोकळा सुटला तर माझे सगळे आकाश भरून टाकेल. गत स्मृतींच्या घट्ट छाया अविरत भटकत येतील ढगांसारख्या त्या आकाशात मग काम कसे होईल? आणि पोट कसे भरेल माझे, याचे, त्याचे, त्यांचे. कष्ट करणारा माझा जीव त्याला सावरायला व्यस्त होईल. फरपटत जायला नको ना त्याच्या पंखांनी केलेल्या नक्षीत भिरभिरत अखंड भोवंड येई पर्यंत. हसतील ना ते सारे वाट बघणारे डोळे, शोधणारे कुठे दिसतो का चुकणारा ताल, सुटलेला तोल.
पण तरीही जिवंत ठेवलाय तो जातिवंत अस्सल खणखणीत वेदनेचा निळाभोर पक्षी. माझ्या अस्तित्वाचा खोल गूढ गुहेत राहतो ना तो. गातो मंद आवाजात माझ्या जाणिवेचे गाणे. कधी रात्री येतो गुपचूप बाहेर सगळे जग झोपल्यावर. कुणाला न कळता जोजवतो तो नासूर झालेल्या वरती खपली धरलेल्या खोल एकट्या वेदनेला. आमचा करार दिवसा बाहेर न येण्याचा पळतो. गप्प झोपायच्या प्रयत्नात आम्ही दोघे ओल्या उशीच्या अभ्य्राला विचारत असतो, ‘मी बिलकूल रडत नाही आणि तू?’ (चार्ल्स बुकोवास्की यांच्या कवितेचा संदर्भ)





