त्रिपुरामध्ये लष्कराने वाचवले 330 लोकांचे प्राण; पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू

आगरताळा – त्रिपुरा राज्याला सध्या भीषण पुराचा फटका बसला आहे. परिस्थिती पाहता लष्कर आणि एनडीआरएफचे जवान मदत आणि बचाव कार्यात तैनात करण्यात आले आहेत. लष्कराने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांनी त्रिपुरातील 330 हून अधिक लोकांची सुटका केली आहे. याशिवाय पूरग्रस्त भागात आसाम रायफल्सचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्रिपुरामध्ये पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत. पुरामुळे 65 हजारांहून अधिक लोक प्रभावित झाले असून हे लोक 450 मदत छावण्यांमध्ये राहत आहेत.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये भारतीय लष्कराने लिहिले की, ‘त्रिपुरामध्ये ऑपरेशन वॉटर रिलीफ अंतर्गत मदत आणि बचाव कार्यादरम्यान 330 हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे. आसाम रायफल्सच्या 21 सेक्टर मुख्यालयांतर्गत 18 आसाम रायफल्सच्या दोन तुकड्या पूरग्रस्त अमरपूर, भामपूर, बिशालगड आणि रामनगरमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. सात नागरिकांना वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री माणिक साहा यांनी आज पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी त्रिपुरातील पूरग्रस्त गोमती आणि दक्षिण त्रिपुरा भागाला भेट दिली. पुरामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले आहे. पूरस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री माणिक साहा यांनी पुढील आदेशापर्यंत सर्व सरकारी आणि खाजगी शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्र सरकारचे मदतीचे आश्वासन –
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांच्याशी त्रिपुरातील पूरस्थितीबाबत बोलून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या एक्स खात्यावर लिहिले, ‘त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक सरकारला मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी केंद्र सरकारने बोटी आणि हेलिकॉप्टर व्यतिरिक्त एनडीआरएफ टीम पाठवली आहे. गरज भासल्यास केंद्राकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल. संकटाच्या या काळात मोदी सरकार त्रिपुरातील आमच्या बहिणी आणि भावांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
पुरग्रस्त त्रिपुरासाठी केंद्राची ४० कोटींची मदत
पूरग्रस्त त्रिपुरासाठी केंद्राने ४० कोटी रुपये देण्यास मंजुरी दिली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सांगितले. राज्य सरकारला पूर आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ११ तुकड्या, लष्कराच्या तीन तुकड्या आणि भारतीय वायुसेनेची चार हेलिकॉप्टर्स केंद्राने तैनात केली आहेत. गृहमंत्री म्हणाले त्रिपुरातील आमच्या बहिणी आणि भावांना मोदी सरकार या कठीण काळात त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे असलेले दिसेल.शहा यांनी गुरुवारी त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांना फोन करून राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला आणि त्यांना केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
त्रिपुरामध्ये गेल्या काही दिवसांत संततधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे किमान २२ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील ४५० मदत छावण्यांमध्ये ६५४०० लोकांनी आश्रय घेतला आहे, त्यांच्या घरांचे मुसळधार पावसामुळे नुकसान झाले आहे. त्रिपुरामध्ये आतापर्यंत सुमारे १७ लाख लोक पाऊस आणि पुरामुळे प्रभावित झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.





