लष्कराने दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळला; जवान जखमी
Updated On:

जम्मू – भारतीय लष्कराने शनिवारी जम्मू विभागात दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळला. त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये चकमक होऊन एक जवान जखमी झाला. ती घटना राजौरी जिल्ह्यातील नौशेरा क्षेत्रात नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत घडली.
दहशतवाद्यांच्या एका गटाने भारतीय हद्दीत शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एलओसीलगत तैनात असणाऱ्या जवानांनी वेळीच दहशतवाद्यांच्या हालचाली हेरल्या. जवानांनी आव्हान दिल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.
त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने घाबरून दहशतवाद्यांनी माघारी पलायन केले. नौशेरा क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न होण्याची आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. याआधी ९ सप्टेंबरला जवानांनी घुसखोरीचा डाव हाणून पाडत २ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.





